पुणे : राज्यात सिकल सेल ॲनेमिया या गंभीर अनुवंशिक रक्तविकाराचे आव्हान अधिक तीव्र होत असल्याचे चित्र समोर आले आहे. राज्यातील २१ जिल्ह्यांत राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय सिकल सेल ॲनेमिया निर्मूलन मिशनअंतर्गत आतापर्यंत सुमारे २४ हजार सिकल सेल रुग्ण आणि २.५ लाखांहून अधिक सिकल सेल वाहक आढळून आले आहेत. विशेषतः आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये या आजाराचे प्रमाण अधिक असल्याचे तपासणीतून स्पष्ट झाले आहे.
सिकल सेल हा अनुवंशिक आजार असून लाल रक्तपेशींमधील हिमोग्लोबिनमध्ये बिघाड झाल्याने रक्तपेशी गोलाकार न राहता कोयत्याच्या आकाराच्या होतात. या पेशी रक्तवाहिन्यांमध्ये अडकून शरीरातील महत्त्वाच्या अवयवांना होणाऱ्या रक्तपुरवठ्यात अडथळा निर्माण करतात. परिणामी तीव्र वेदना, जंतुसंसर्ग तसेच अवयव निकामी होण्याचा धोका वाढतो.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली राज्यात जुलै २०२३ पासून राष्ट्रीय सिकल सेल ॲनेमिया निर्मूलन मिशन राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत ० ते ४० वयोगटातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर तपासणी सुरू असून २०२३ ते २०२६ या कालावधीत ९३ लाख तपासण्यांचे लक्ष्य देण्यात आले आहे. १८ नोव्हेंबर २०२५ अखेर सुमारे ८७ टक्के तपासणी पूर्ण झाली असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
या मिशनअंतर्गत सिकल सेल वाहक व रुग्णांची मोफत तपासणी, एचपीएलसीद्वारे निश्चित निदान, समुपदेशन तसेच औषधोपचार उपलब्ध करून देण्यात येत आहेत. गंभीर रुग्णांसाठी हायड्रॉक्सीयुरिया उपचार, आवश्यकतेनुसार मोफत रक्त संक्रमण आणि गर्भावस्थेत प्रसूतिपूर्व निदानाची सुविधा देण्यात येत आहे. तसेच सिकल सेल रुग्णांना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत मासिक आर्थिक सहाय्य व आयुष्मान भारत व महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत उपचार सुविधा उपलब्ध आहेत.
सिकल सेल आजाराचा पुढील पिढीत प्रसार रोखण्यासाठी विवाहपूर्व समुपदेशन, गर्भवती मातांची तपासणी आणि व्यापक जनजागृती मोहिमा राबविण्यात येत आहेत. शासनाच्या या प्रयत्नांमुळे सिकल सेल आजारावर नियंत्रण मिळवून २०४७ पर्यंत संपूर्ण उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट साध्य होईल, असा विश्वास आरोग्यतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
---------------
जिल्हानिहाय सिकलसेल वाहक व रुग्णांची आकडेवारी
अ. क्र. जिल्हा सिकलसेल वाहक सिकलसेल रुग्ण
१ ठाणे १,८५७ ११४
२ पालघर १२,४२१ ९७५
३ नाशिक ४,१५० ४११
४ नंदूरबार १७,१६६ ३,४२०
५ अमरावती १६,६२० १,७२०
६ गोंदिया १६,३३२ १,८०२
७ गडचिरोली ४३,३१२ २,९७३
८ नागपूर ४३,०८० ३,८००
९ वर्धा २६,२६० १,३३२
१० चंद्रपूर ३८,९७१ २,१५८
११ भंडारा १६,३३७ १,०३४
१२ यवतमाळ २०,०२५ १,४७४
१३ धुळे ११,६४६ १,४०८
१४ जळगाव ६,७५१ ४२७
१५ नांदेड १,४८९ १९३
१६ वाशिम २,१७८ १७३
१७ अकोला ६,५५२ २८०
१८ बुलढाणा १,७३९ २४४
१९ छत्रपती संभाजीनगर ४७८ ५२
२० रायगड ५१० ५७
२१ हिंगोली ९५९ ११६
एकूण २,८८,८३३ २४,१६३
Web Summary : Maharashtra faces a sickle cell anemia crisis, with 24,000 patients and over 2.5 lakh carriers identified. Screening and treatment are underway, targeting eradication by 2047 through the national mission, focusing on tribal areas.
Web Summary : महाराष्ट्र सिकल सेल एनीमिया संकट का सामना कर रहा है, 24,000 मरीज़ और 2.5 लाख से ज़्यादा वाहक पाए गए। राष्ट्रीय मिशन के ज़रिए 2047 तक उन्मूलन के लक्ष्य के साथ स्क्रीनिंग और इलाज जारी है, जनजातीय क्षेत्रों पर ध्यान केंद्रित किया जा रहा है।