रेशनचे धान्य उचलण्यासाठी १५ दिवसांची मुदतवाढ, ग्राहकांना मोठा दिलासा
By नितीन चौधरी | Updated: May 7, 2025 15:34 IST2025-05-07T15:33:22+5:302025-05-07T15:34:05+5:30
- जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी राज्य सरकारकडे मुदतवाढीसाठी मागणी केली होती

रेशनचे धान्य उचलण्यासाठी १५ दिवसांची मुदतवाढ, ग्राहकांना मोठा दिलासा
पुणे : राज्य सरकारने रेशनवरील धान्य वाटपासाठी पुढील महिन्याचे धान्य आदल्या महिन्याच्या अखेरच्या तारखेपर्यंतच उचलावे, असे सक्त निर्देश दिले होते. मात्र भारतीय अन्न महामंडळाकडून धान्याचा पुरवठा वेळेत न झाल्याने जिल्ह्यातील मे महिन्याचे सुमारे ८ हजार टन धान्य उचलता आले नव्हते. परिणामी ग्राहक धान्यापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती.
याबाबत जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी राज्य सरकारकडे मुदतवाढीसाठी मागणी केली होती. त्यानुसार आता राज्य सरकारने मे महिन्याचे धान्य उचलण्यासाठी १७ मेपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
केंद्र सरकारच्या निर्देशानुसार पुढील महिन्याच्या धान्यवाटपासाठी आदल्या महिन्याच्या अखेरच्या तारखेपर्यंत धान्य उचलावे, असे आदेश राज्य सरकारने सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी तसेच अन्नधान्य वितरण अधिकारी यांना दिले आहेत. धान्य उचलण्यासाठी कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही, असेही राज्य सरकारतर्फे सांगण्यात आले होते. या आदेशाचा फटका जिल्ह्यातील धान्यवाटपावर होण्याची शक्यता होती. जिल्ह्यात महिन्याला १४ हजार टन धान्य उचलावे लागते. त्यानुसार मे महिन्याचे धान्य ३० एप्रिलपर्यंत उचलावे लागणार होते. मात्र, भारतीय अन्न महामंडळाकडून धान्याचा पुरवठा न झाल्याने २८ एप्रिलपर्यंत केवळ ६ हजार टन धान्याची उचल झाली होती.
राज्य सरकारच्या निर्देशांनुसार दोन दिवसांत ८ हजार टन धान्य उचलणे शक्य नव्हते. हे धान्य न उचलल्यास ग्राहकांना त्याचे वितरण करता येणार नव्हते. परिणामी अनेक ग्राहक धान्यापासून वंचित राहण्याची शक्यता होती. याचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सुधळकर यांनी धान्य उचलण्यासाठी मुदतवाढ मिळावी, अशी मागणी राज्य सरकारकडे केली होती. त्यानुसार राज्य सरकारने मे महिन्यातील भारतीय अन्य महामंडळाकडे धान्य उचलण्यासाठी ३ ते १७ मे अशी १५ दिवसांची मुदतवाढ दिली आहे.
याबाबत सुधळकर म्हणाले, “मे महिन्याचे अजूनही ६ हजार टन उचल झालेली नाही. या निर्णयामुळे १७ तारखेपर्यंत हे धान्य उचलता येणार आहे. त्याचप्रमाणे ३० मेपर्यंत जूनचे १४ हजार टन धान्यही उचलावे लागणार आहे. राज्य सरकारच्या मुदतवाढीमुळे ग्राहकांना वेळेत धान्य वितरण करता येणार आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील सुमारे ५० टक्के दुकानांमध्ये धान्य पोच झालेली आहे. त्या ग्राहकांना धान्य वाटपही सुरू झाले आहे.”
जिल्ह्यातील सर्व धान्य कोरेगाव पार्क येथील गोदामातूनच द्यावे, अशी मागणी भारतीय अन्न महामंडळाकडे केली होती. मात्र जूनचे धान्य फुरसुंगी गोदामातून उचलावे अशी सूचना महामंडळाने केली आहे. त्यामुळे कंत्राटदाराला फुरसुंगी येथील गोदामातून धान्य उचल करावी लागणार आहे. यात आणखी विलंब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कंत्राटदाराला एक हजाराहून अधिक टन धान्य दररोज उचलावे लागणार आहे. - महेश सुधळकर, जिल्हा पुरवठा अधिकारी, पुणे.