मतदान केंद्रावर आता १२०० मतदार, गर्दी कमी करण्यासाठी उपाययोजना

By नितीन चौधरी | Updated: March 22, 2025 12:59 IST2025-03-22T12:59:27+5:302025-03-22T12:59:57+5:30

मतदान केंद्रावर आता १२०० मतदार, तीनशेंनी कमी होणार संख्या, मतदान केंद्रांमध्ये २५ टक्क्यांची होणार वाढ, केंद्रीय निवडणूक आयोगाचे निर्देश

pune news 1200 voters now at polling station, measures taken to reduce crowd | मतदान केंद्रावर आता १२०० मतदार, गर्दी कमी करण्यासाठी उपाययोजना

मतदान केंद्रावर आता १२०० मतदार, गर्दी कमी करण्यासाठी उपाययोजना

पुणे :मतदान केंद्रांवरील रांगा कमी करण्याच्या उद्देशाने केंद्रीय निवडणूक आयोगाने यापुढे प्रत्येक मतदान केंद्रावर १ हजार २०० मतदारच असतील, या दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिले आहेत. परिणामी, प्रत्येक मतदान केंद्रावरील पूर्वीची दीड हजार मतदारांची संख्या कमी होणार असल्यामुळे मतदान केंद्रांची संख्या किमान २५ टक्क्यांनी वाढेल. यासह मतदानासाठी आवश्यक असणारे मतदान यंत्र, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट यांची संख्याही देखील वाढणार आहे. मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक असणारी यंत्रणा अर्थात अधिकारी, कर्मचारी व सुरक्षा व्यवस्था यातही वाढ करावी लागणार आहे. प्रत्येक मतदाराला त्याच्या दोन किलोमीटर परिघातच मतदान केंद्र उपलब्ध करून द्यावे, अशा सूचनाही आयोगाने दिले आहेत.

देशाचे २६ वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर ज्ञानेश कुमार यांनी नुकत्याच झालेल्या सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या बैठकीत हे निर्देश दिले. मतदान प्रक्रियेत मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी ज्ञानेश कुमार यांनी विविध उपाय सुचवले असून यातून मतदानाचा टक्का देखील वाढेल असा विश्वास व्यक्त केला आहे. यात महत्त्वाचा निर्णय म्हणजे आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये प्रत्येक मतदान केंद्रावर १ हजार ५०० मतदार मतदान करत होते. ही संख्या दीड हजारांपेक्षा जास्त झाल्यास त्याच ठिकाणी साहाय्यकारी मतदान केंद्र उभारले जात होते.

मात्र, आता निवडणूक आयोगाने मतदान केंद्रांवरील रांगा कमी करण्याच्या उद्देशाने एका मतदान केंद्रावरील दीड हजार असणारी मतदारांची संख्या बाराशे इतकीच केली आहे. त्यामुळे शहरी भागात मतदानाच्या अखेरच्या टप्प्यात लागणाऱ्या रांगा कमी होतील, असा आयोगाला विश्वास आहे. त्यानुसार सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी बाराशेनुसार मतदान केंद्रांची संख्या निर्धारित करावी, असे निर्देशही दिले आहेत. या निर्णयामुळे राज्यात किमान २५ टक्के मतदान केंद्रांची संख्या वाढणार आहे.

पुणे जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी पात्र मतदारांची संख्या ८८ लाख ४९ हजार ५९० इतकी होती. त्यासाठी जिल्ह्यातील ३ हजार २३४ ठिकाणी एकूण ८ हजार ४६२ मतदान केंद्रांची स्थापना करण्यात आली होती. त्यात १४९ ठिकाणी ५ पेक्षा जास्त मतदान केंद्र आहेत. १०७ ठिकाणी ६, ८० ठिकाणी ७, ५५ ठिकाणी ८, ४३ ठिकाणी ९ तर १३४ ठिकाणी १० मतदान केंद्र होते. आता मतदान केंद्रांवर बाराशेपेक्षा जास्त मतदार नसतील ही शक्यता गृहीत धरून जिल्ह्यातील मतदान केंद्रांची संख्या किमान अडीच ते तीन हजार वाढेल, अशी शक्यता जिल्हा निवडणूक शाखेतील सूत्रांनी व्यक्त केली.

जिल्ह्यातील या मतदान केंद्रांवर १३ हजार ६९४ मतदान यंत्रे अर्थात ईव्हीएम, १० हजार १४४ कंट्रोल युनिट तसेच १० हजार ९९३ व्हीव्हीपॅट यंत्रेही देण्यात आली होती. या सर्व मतदान केंद्रांवर ९ हजार ३०८ केंद्राध्यक्ष, ९ हजार ३०८ प्रथम मतदान अधिकारी व १२ हजार २३ अतिरिक्त मतदान अधिकारी असे एकूण ३९ हजार ९४८ अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. मतदान केंद्रांची संख्या किमान तीन हजारांनी वाढल्यास या अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी लागणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले यासह सुरक्षा व्यवस्थेसाठी देखील आवश्यक असणारे पोलीस बल वाढवावे लागणार असेही त्यांनी सांगितले.

या संदर्भात राज्य निवडणूक आयोगातील सूत्रांच्या मते २०२९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीवेळी असलेल्या मतदारांच्या संख्येवर तसेच निवडणूक आयोगाने निर्धारित केलेल्या बाराशे मतदारांच्या संख्येवर मतदान केंद्रांची संख्या अवलंबून असणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्रांची संख्या निश्चितच वाढेल. तर दोन किलोमीटर परिघाच्या आतच मतदाराला त्याचे मतदान केंद्र उपलब्ध करून द्यावे लागणार आहे ही अटही आता कसोशीने पाळावी लागणार आहे. त्यामुळे देखील मतदारांची मतदान केंद्रांची संख्या वाढू शकते, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली.

Web Title: pune news 1200 voters now at polling station, measures taken to reduce crowd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.