दौंड - पुणे शटलमध्ये दहशत निर्माण करणारा ऋतिक लांडगे (रा. दौंड) याला अटक करण्यात आली असल्याची माहिती लोणी काळभोर रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
दौंड रेल्वे स्थानकातून संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास दौंड रेल्वे स्थानकातून पुण्याकडे जाण्यासाठी शटल निघाली. दौंड स्थानक सुटताच संबंधित तरुणाने डब्यात आरडाओरडा करत प्रवाशांना शिव्या देण्यास सुरुवात केली. डब्यातील प्रवाशांना मारण्याची धमकी देत होता. यावेळी शटलच्या डब्यामध्ये मोठी दहशत निर्माण केल्याने प्रवासी भयभीत झाले होते.
डब्यात असलेले प्रवासी जीवाच्या भीतीने त्याला थांबवू शकत नव्हते. दरम्यान, एका प्रवाशाने धाडस करून रेल्वेच्या मदतीच्या १३९ वर फोन करून तातडीची मदत करण्याबद्दल आणि डब्यामध्ये त्या दहशत निर्माण करणाऱ्या व्यक्तीपासून प्रवाशांच्या सुरक्षितलेला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे डब्यात रेल्वे सुरक्षा पथक लवकरात लवकर पाठवावे, असे रेल्वे प्रशासनाला सांगितले. त्यानुसार यवत रेल्वे स्थानकात गाडी येताच डब्यामध्ये रेल्वे सुरक्षा बलाचे जवान आले आणि संबंधित दहशत निर्माण करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच धावत्या गाडीत डब्यामध्ये प्रवाशांच्या तक्रारी आणि लेखी जबाब घेण्यात आले. त्यानंतर लोणी रेल्वे स्थानकामध्ये गाडी पोहोचल्यानंतर दहशत निर्माण करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली. दरम्यान, दंडात्मक कारवाईनंतर त्याला सोडून देण्यात आले आहे.