PUNE : पालिका रस्ते झाडण्यासाठी करणार १२९ कोटी रुपये खर्च
By राजू हिंगे | Updated: February 8, 2025 14:13 IST2025-02-08T14:12:13+5:302025-02-08T14:13:35+5:30
सात वर्षांसाठीच्या तीन निविदांना स्थायी समितीची मान्यता

PUNE : पालिका रस्ते झाडण्यासाठी करणार १२९ कोटी रुपये खर्च
पुणे : शहरातील प्रमुख ९ रस्त्याचे झाडणकाम यांत्रिकीकरणाद्वारे (रोड स्वीपर) करण्यासाठी चार परिमंडळांसाठी निविदा काढल्या होत्या. त्यापैकी एका निविदेवर आक्षेप असल्याने ती वगळता उर्वरित तीन परिमंडळाच्या ५.७५ टक्के जादा दराने आलेल्या १२९ कोटी ६२ लाखांच्या निविदांना स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
रोड स्वीपरच्या तीन निविदा मंजूर झाल्या आहे. त्यात परिमंडळ दोन, तीन आणि चारसाठी सात वर्षांकरिता प्रत्येकी ४३ कोटी २० लाख ७६ हजार २२६ रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली आहे. विशेष म्हणजे या तिन्ही निविदांची रक्कम एकसारखीच आली आहे. यामध्ये रस्ते झाडण्यासाठीचा प्रति किलोमीटरचा खर्च १ हजार ३३९ रुपये येणार आहे. रोज ४० किलोमीटर लांबीचे रस्ते झाडावे लागणार आहे.
पुणे महापालिकेने यापूर्वीच चार परिमंडळांसाठी पाच वर्षांकरिता ६० कोटी रुपयांची निविदा काढली होती. पण त्यात ठेकेदाराने ३८ ते ४० टक्के जादा दराने निविदा भरल्याने ही निविदा रद्द केली होती. महापालिकेने फेरनिविदा काढता नियम व अटी बदलून निविदेची व्याप्ती वाढवली होती. त्यात निविदेची मुदत पाच ऐवजी सात वर्षाची केली आहे, तसेच अन्य तांत्रिक गोष्टींचा समावेश केल्याने हा खर्च वाढून तो तब्बल १७२ कोटी रुपयांपर्यंत गेला आहे. पूर्वीच्या निविदेपेक्षा आताचा खर्च सुमारे ११२ कोटी रुपयांनी वाढला आहे.
पेव्हरमेंट स्वीपरच्या दोन मशिन, लीफ ब्लोअरचा समावेश केला आहे. झाडणकाम करण्यासाठी प्रत्येक रस्त्याला ७ कर्मचारी आणि तीन वाहन ठेवणे अशा अटी टाकण्यात आल्या आहेत. या अटी काही ठेकेदारांच्या फायद्यासाठी बदलल्याची चर्चा महापालिकेत सुरु होती. त्यावर प्रशासनाने अन्य शहरांच्या तुलनेत पुणे महापालिकेने पूर्वगणनपत्रक कमी असल्याचा दावा केला होता.