पुणे: महापालिका निवडणुकीसाठीच्या प्रभागांचे प्रारूप सादर झाले तरी त्यावर हरकती, सूचना व त्याची सुनावणी झाल्यानंतरच हे प्रारूप अंतिम होईल. या अंतिम रचनेवरच राजकीय पक्षांची निवडणुकीसाठीची रणनिती ठरणार आहे. उमेदवारीसाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांमध्ये जोरदार स्पर्धा आहे, त्यातूनच बंडखोरी होण्याची शक्यता आहे. ती टाळण्यासाठी नेते आतापासूनच सावधगिरी बाळगताना दिसत आहेत.
एका प्रभागात ४ सदस्य याच पद्धतीने महापालिका निवडणूक होणार इतके तरी आता निश्चित आहे. प्रशासनाने कितीही नाकारले तरीही सत्ताधारी पक्षांनी आपापल्या सोयीप्रमाणे प्रभाग रचना करून घेतल्याचे सांगण्यात येते. त्यातही त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा जास्त प्रभाव असल्याचे उघडपणे बोलले जात असते. त्यामुळेच आता प्रारूप झाल्यावर त्यावर विरोधकांकडून सर्वप्रथम त्याचा अभ्यास करण्यात येईल. प्रशासनाला नियमाप्रमाणे प्रारूप रचनेवर विशिष्ट मुदतीत हरकती व सूचना मागव्याला लागतील. आलेल्या सर्व हरकती व सुचनांवर सुनावणी घ्यावी लागेल व त्यानंतर अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध होईल. या अंतिम रचनेवरच राजकीय पक्षांची निवडणुकीची रणनिती ठरणार आहे. त्यामुळे सगळेच पक्षप्रमुख प्रभाग रचनेवर लक्ष ठेवून आहेत. आताच कोणाला कसला शब्द देणे त्यांच्याकडून टाळले जात आहे.
राज्यात सध्या महायुतीचे सरकार आहे. त्यामध्ये भारतीय जनता पक्ष हा प्रमुख व शिवसेना (एकनाथ शिंदे), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) हे दोन घटक पक्ष तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व अन्य काही पक्ष, आघाड्या यांचा समावेश आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) व शिवसेना (उद्धव ठाकरे) तसेच अन्य पक्ष यांचा समावेश आहे. या प्रमुख ६ राजकीय पक्षांशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आम आदमी पार्टी (आप) हेही पक्ष निवडणुकीच्या रिंगणात असतील. निवडणूक महायुती व महाविकास आघाडी अशी होईल की प्रत्येक पक्ष स्वतंत्रपणे लढेल याविषयी अद्याप कसलीही निश्चिती नाही. शिवसेना (उद्धव ठाकरे) व मनसे यांची युतीही अद्याप अनिश्चित आहे. आपने मात्र आघाडीतून बाहेर पडल्याचे जाहीर केले आहे.
आजी-माजी नगरसेवकांशिवाय शहरात नगरसेवक होऊ इच्छिणाऱ्यांची फार मोठी संख्या शहरात आहे. त्यामुळेच बंडखोरीचीही शक्यता आहे. प्रमुख राजकीय पक्षांचे नेते त्यामुळे आतापासूनच चितेंत आहेत. बंडखोरी थोपवण्याचे मोठाच आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे असे दिसते. उमेदवारी देऊ शकणाऱ्या राजकीय पक्षांचे पर्यायही एकापेक्षा जास्त आहेत. त्यामुळेही बंडखोरी वाढेल असे राजकीय वर्तुळातील अनेकांचे मत आहे. बंडखोरी होऊ नये यासाठी म्हणूनच प्रमुख नेते सावधगिरीने पावले टाकताना दिसत आहेत.
प्रभाग रचनेत भाजपचा हस्तक्षेप आहे असे विरोधक म्हणतात. हा हरल्यावर कारणे शोधण्याचाच प्रकार आहे. आम्ही प्रारूप रचनेचे अभ्यास करून, अंतिम रचना प्रसिद्ध झाल्यानंतर पुढचे निर्णय घेतले जातील. आताच त्याबाबत काही बोलणे योग्य ठरणार नाही. - धीरज घाटे, शहराध्यक्ष, भारतीय जनता पक्ष प्रभाग रचनेमध्ये भाजपचे अगदी १०० टक्के हस्तक्षेप केला आहे. प्रारूप जाहीर झाल्यानंतर ते लक्षात येईलच. आमच्याकडून प्रभाग रचनेचा बारकाईने अभ्यास करू व त्यानुसार हरकती घेण्यात येतील. आम्ही निवडणुकीसाठी सज्ज आहोत, आघाडीबाबतचा निर्णय वरिष्ठ घेतील इतकेच सध्या सांगता येईल. -प्रशांत जगताप, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)