पुणे : नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीमध्ये समाविष्ट ३२ गावांतून १६ नगरसेवक निवडून आले आहेत. यामध्ये सर्वाधिक १३ नगरसेवक भाजपचे असून तीन नगरसेवक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. या गावांचा संतुलित विकास होण्यासाठी महापालिकेतील महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सभागृहनेते किंवा विरोधी पक्षनेते यांसारख्या महत्त्वाच्या पदांवर गावकऱ्यांना संधी मिळणार का? हे पाहणे औसुक्याचे ठरणार आहे.
महापालिका हद्दीत २०१७ मध्ये ११ गावांचा तर २०२१ मध्ये २३ गावांचा समावेश झाला. त्यानंतर दोन गावे महापालिकेतून वगळून त्यांची स्वतंत्र नगरपरिषद करण्यात आली. महापालिका आणि पीएमआरडीएच्या माध्यमातून ३२ गावांमध्ये बांधकाम परवानग्या देताना पाणी, ड्रेनेज अथवा रस्त्यांचा विचार करण्यात आला नाही. केवळ प्रादेशिक विकास आराखड्यात कागदावर दर्शवण्यात आलेले रस्ते गृहीत धरून परवानग्या देण्यात आल्या. त्यामुळे अस्तित्वात असलेले अरुंद रस्ते, पदपथांचा अभाव, जिल्हा परिषदेकडून हस्तांतरित झालेल्या मोडकळीस आलेल्या शाळांच्या आणि आरोग्य केंद्रांच्या वास्तू, अपुरी सांडपाणी व्यवस्था आणि कचऱ्याचे साम्राज्य अशाच गोष्टींमुळे बकालपणा दिसून येत आहे.
महापालिकेच्या माध्यमातून काही गावांचा पाणी पुरवठ्याचा विकास आराखडा तयार करून पाणी पुरवठा योजनांचे काम सुरू केले आहे. सुरुवातीच्या ११ गावांमध्ये ड्रेनेज लाईनचे काम सुरू झाले आहे. कचरा व्यवस्थापनासाठी सुविधा सुरू केली आहे. परंतु याला म्हणावी तशी गती अद्याप मिळालेली नाही. याला लोकप्रतिनींचा अभाव हे कारण आहे. विशेष असे की ११ गावांमधून दोन नगरसेवक निवडून आले होते. मात्र , भौगोलिक परिस्थिती आणि मिळणारा निधी यामध्ये मोठे अंतर असल्याने त्यांनाही फारशी चमक दाखवणे अशक्य होते. परंतु नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये समाविष्ट गावांतून तब्बल १६ नगरसेवक निवडून आले आहेत.
यामध्ये सर्वाधिक १३ नगरसेवक सत्ताधारी भाजपचे असून तीन नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. या नगरसेवकांना आपापल्या भागात काम करण्याची संधी मिळणार आहे. भाजपने २०१७ च्या महापालिकेतील सत्ताकाळात महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सभागृह नेते, अशी प्रमुख पदे शहराच्या मध्यवर्ती भागातील नगरसेवकांकडे दिली होती. आता उपनगरे आणि समाविष्ट गावांतील नागरिकांनी भाजपवर विश्वास दाखवल्याने गावांचा संतुलित विकास होण्यासाठी महापालिकेतील महत्त्वाच्या पदांवर गावकऱ्यांना संधी मिळणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.
Web Summary : Sixteen corporators from included villages won Pune's PMC election, mostly BJP. Will villagers get key posts for balanced development, like mayor? Development challenges persist.
Web Summary : पुणे पीएमसी चुनाव में शामिल गांवों से सोलह पार्षद जीते, जिनमें ज्यादातर भाजपा के हैं। क्या संतुलित विकास के लिए ग्रामीणों को मेयर जैसे प्रमुख पद मिलेंगे? विकास चुनौतियां बरकरार हैं।