पुणे : महापालिकेतील दुसऱ्या मजल्यावरील आठ विभागाच्या कार्यालयांना तीन दिवसांत कार्यालय स्थलांतर करण्याचे आदेश भवन विभागाचे मुख्य अभियंता युवराज देशमुख यांनी दिले आहेत. महापालिकेत अद्ययावत आपत्ती व्यवस्थापन कक्षासाठी ही कार्यालय स्थलांतरित केली जाणार आहेत. त्यामुळे या आठ विभागांवर स्थलांतराची आपत्ती आली आहे.
शहरातील आपत्ती व्यवस्थापनासाठी महापालिकेला केंद्र सरकारकडून सुमारे २५० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्याअंतर्गत अद्ययावत आपत्ती व्यवस्थापन विभाग उभारला जाणार आहे. यासाठी महापालिकेने जुन्या इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावरील ‘ड’ विंगमधील जागा निश्चित केली आहे. येथे सध्या मुख्य लेखापाल, उपायुक्त विशेष, झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभाग, चाळ विभाग, स्वच्छ सर्वेक्षण अभियान कार्यालय, बांधकाम विकास विभाग यांची भांडार खोली, विधी विभाग यांची भांडार खोली, भूसंपादन विभाग यांची भांडार खोली आहे.
या ठिकाणी महत्त्वाचे व खूप जुने असे कागदपत्र आहेत. आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्थापत्यविषयक कामे करावी लागणार आहेत. त्यामुळे दुसऱ्या मजल्यावरील या कार्यालयांचे स्थलांतर करणे आवश्यक आहे. पर्यायी जागा म्हणून मुख्य लेखा व परीक्षण विभागाला तळ मजल्यावरची मिळकतकर विभागाची जागा दिली आहे. उपायुक्त विशेष यांना सध्याच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाची पाचव्या मजल्यावरील जागा दिली आहे. झोपडपट्टी पुनर्वसन विभाग आणि स्वच्छ सर्वेक्षण विभागाला सावरकर भवन येथे स्थलांतरित केले जाईल.