‘रंग यात्रा’ ॲपचा अट्टहास का ? पुणे महापालिकेच्या ऑनलाइन बुकिंगला कलाकारांचा विरोध
By श्रीकिशन काळे | Updated: March 15, 2025 16:19 IST2025-03-15T16:16:35+5:302025-03-15T16:19:17+5:30
-कोणाशीही चर्चा न करताच पालिकेने ॲप तयार केल्याचा आरोपही करण्यात येत आहे. हे ॲप बंद करावे, अशी मागणीही होत आहे.

‘रंग यात्रा’ ॲपचा अट्टहास का ? पुणे महापालिकेच्या ऑनलाइन बुकिंगला कलाकारांचा विरोध
पुणे : पुणे महापालिकेच्या अमृत महोत्सवानिमित्त सांस्कृतिक केंद्र विभागाच्या वतीने नाट्यगृह आणि सांस्कृतिक केंद्रामधील ऑनलाइन बुकिंगसाठी ‘रंग यात्रा’ हे मोबाईल ॲप्लिकेशन तयार करण्यात आले. या ऑनलाइन बुकिंग अँपला पुणे शहरातील विविध संस्थांनी विरोध केला आहे. कोणाशीही चर्चा न करताच पालिकेने ॲप तयार केल्याचा आरोपही करण्यात येत आहे. हे ॲप बंद करावे, अशी मागणीही होत आहे.
शहरातील नाट्यसंस्था व इतर कलाकारांनी एकत्र येऊन बैठक घेतली. त्यामध्ये या ॲपचा विरोध केला आणि तो निर्णय रद्द करण्याचा ठराव करण्यात आला. जर ॲप सुरू ठेवले तर कलाकारांनी आंदोलनाचा इशारा दिला. या बुकिंगच्या विरोधाला पाठिंबा म्हणून मुंबईतून प्रशांत दामले, शरद पोंशे, भाग्यश्री देसाई, अशोक हांडे यांनी देखील पाठिंबा दर्शविला असल्याचे राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी सांगितले. या वेळी संवाद, मराठी चित्रपट असोसिएशन, मोरया थेटर्स, शिवरत्न प्रॉडक्शन, वेदवंदी, विजय पटवर्धन फांउडेशन, निनाद फिल्म, मनोरंजन, रंग यात्रा, सुरश्री प्रॉडक्शन आदी अनेक संस्थांनी विरोध दर्शविला.
या ॲपमुळे नाटक व्यवस्थापक, निर्माते, कलाकार, लावणी निर्माते, व्यवस्थापक, या सर्वांच्या दृष्टीकोनातून ऑनलाइन बुकिंग अव्यवहार्य ठरणार आहे. ऑनलाइन बुकिंग करत असताना हजारोंच्या घरात जर नाट्यगृहासाठी अर्ज आले, तर कुठल्याही नाट्यगृहाच्या बॅक ऑफिसला हुशार, अनुभवी, सक्षम टीम नाही. त्यामुळे गोंधळ वाढेल. सध्या नाट्यगृहांमध्ये इंटरनेट किंवा वायफायची सुविधा देखील अद्याप नाही, मग एवढ्या मोठ्या प्रमाणात ऑनलाईन बुकिंग केलेल्या संस्थांचे वाटप कसे करणार ? ऑनलाइन बुकिंग करताना मोठमोठ्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्या पैशाच्या जोरावर सर्व बुकिंग अगोदरच करून ठेवतील. त्यामुळे इतर नाट्यसंस्था किंवा कलाकारांना बुकिंग करणं अवघड जाईल.
पुणे महानगरपालिकेने हे ऑनलाईन बुकिंग ॲप ज्यांच्यासाठी तयार केले, त्याच सर्व मराठी नाटक, व्यवस्थापक, निर्मात्यांनी, लावणी निर्मात्यांनी विरोध दर्शविला आहे. तरी देखील या ॲपचा अट्टहास का ? असा सवाल उपस्थित होत आहे. या संदर्भात पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन देण्यात येणार आहे. याविषयी पुणे महापालिका आयुक्तांना व सांस्कृतिक उपायुक्तांना निवेदन दिले असून, ॲप रद्द करण्याची मागणी केली.