पुणे महापालिकेला मिळेना दोन अतिरिक्त आयुक्त
By राजू हिंगे | Updated: December 25, 2024 15:13 IST2024-12-25T15:11:35+5:302024-12-25T15:13:44+5:30
पुणे महापालिकेतील एकाच अतिरिक्त आयुक्तांवर कामाचा ताण येत आहे.

पुणे महापालिकेला मिळेना दोन अतिरिक्त आयुक्त
पुणे :पुणे महापालिकेतील दोन अतिरिक्त आयुक्तांची लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर एप्रिल महिन्यात बदली करण्यात आली होती. तेव्हापासुन ही दोन्ही पदे रिक्त आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर नवीन सरकार आल्यानंतर अतिरक्त आयुक्तांची दोन पदे भरली जातील असे सांगण्यात येत होते. पण अदयापही ही दोनपदे रिक्त आहेत. त्यामुळे पुणे महापालिकेतील एकाच अतिरिक्त आयुक्तांवर कामाचा ताण येत आहे.
निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार लोकसभा निवडणुकीच्या घोषणेपुर्वी एकाच जिल्ह्यात तीन वर्षांपासून अधिक काळ काम करणार्या प्रशासकीय आणि पोलिस अधिकार्यांची अन्य जिल्ह्यात बदली करण्यात आली. राज्यसरकारने पुणे महापालिका आयुक्त, तीन अतिरिक्त आयुक्त या आयएएस अधिकार्यांसह उपायुक्त दर्जाच्या पाच अधिकार्यांची बदली केली. बदली झालेल्या या अधिकार्यांच्या जागेवर अन्य अधिकार्यांची नियुक्ती होईल, अशी अपेक्षा होती. त्यानुसार महापालिका आयुक्त पदावर डॉ. राजेंद्र भोसले यांची तर अतिरिक्त आयुक्तांच्या रिक्त झालेल्या तीन जागांपैकी केवळ एका जागेवर पृथ्वीराज बी.पी. यांची नेमणूक झाली. परंतू उर्वरीत दोन अतिरिक्त आयुक्त आणि पाच उपायुक्तांच्या जागा रिक्तच ठेवण्यात आल्या. लोकसभा निवडणुकीची जूनमध्ये आचारसंहिता संपली. यानंतर उपायुक्तांच्या रिक्त जागांवर शासनातील अधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली.
साधारण त्याचवेळी अतिरिक्त आयुक्त पदाच्या जागाही भरण्यात येतील अशी अपेक्षा होती. परंतू विधानसभा निवडणुका होउनही नवीन सरकार स्थापन झाले आहे. तरीही अतिरिक्त आयुक्तपदाच्या दोन्ही जागा रिक्तच ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे गेल्या आठ महिन्यांपासून अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांच्याकडेच सर्वच विभागांचा कारभार आहे. त्यामुळे एका अतिरिक्त आयुक्तांना कारभार संभाळताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
मर्जीतील का होईना पदे त्वरित भरा
राज्यात महायुतीचे सरकार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या मर्जीतील अधिकारी पुणे महापालिकेच्या अतिरक्त आयुक्तपदावर बसणार आहे. त्यासाठी काही अधिका०यांनी फिल्डींग लावली आहे. शहरातील सर्व पक्षाचे पदाधिकारी अतिरिक्त आयुक्त पदावर मर्जीतील अधिकारी बसवा पण ही पदे लवकर भरा असे सांगत आहे.