Pune Metro: रूबी हॉल ते रामवाडी मेट्रो व्यावसायिक तत्वावर डिसेंबरमध्ये सुरू होणार
By राजू इनामदार | Updated: October 7, 2023 15:31 IST2023-10-07T15:21:49+5:302023-10-07T15:31:17+5:30
स्वारगेट ते मंडई एप्रिल २०२४ : रूबी ते रामवाडी चाचणी यशस्वी...

Pune Metro: रूबी हॉल ते रामवाडी मेट्रो व्यावसायिक तत्वावर डिसेंबरमध्ये सुरू होणार
पुणे : महामेट्रोच्या वनाज ते रामवाडी या मार्गाचा रूबी हॉल ते रामवाडी हा अंतिम टप्पा व्यावसायिक तत्वावर डिसेंबरमध्ये सुरू होणार आहे. स्वारगेट ते मंडई व मंडई ते सिव्हिल कोर्ट व्हाया कसबा पेठ हा शिल्लक राहिलेला भूयारी मार्ग सुरू होण्यास मात्र पुढील वर्षाचा एप्रिल महिना उजाडेल असे दिसते आहे.
पिंपरी-चिंचव़ड ते स्वारगेट या मार्गाचा शिवाजीनगर ते स्वारगेट या ५ किलोमीटरचा मार्ग भूयारी आहे. तो आता शिवाजीनगर ते सिव्हिल कोर्ट असा सुरू झाला आहे. स्वारगेट ते मंडई व्हाया कसबा पेठ व सिव्हिल कोर्ट हा मार्ग सुरू झाला की ५ किलोमीटर अंतराचा शहराच्या मध्यभागातून जाणारा भूयारी मार्ग पूर्ण होईल. सध्या मंडई स्थानकाचे बरेचसे काम बाकी आहे. तसेच कसबा पेठेतील कामही शिल्लक आहे. स्वारगेटमधील भूयारी स्थानकाचे काम महामेट्रोने पूर्ण करत आणले आहे. या भूयारी मार्गातील मेट्रो मार्ग पूर्ण झाला आहे, फक्त भूयारी स्थानकांचे काम बाकी आहे. त्यासाठी पुढील वर्षाच्या एप्रिलपर्यंत वाट पहावी लागेल.
दरम्यान महामेट्रोने शनिवारी रूबी हॉल ते रामवाडी या अंतराची चाचणी घेतली. ती यशस्वी झाली असल्याचे महामेट्रोकडून सांगण्यात आले. ट्रॅक, वीज, सिग्नलिंग, देखभाल आणि ऑपरेशन्ससह मेट्रोचे सर्व विभाग या चाचणीदरम्यान पूर्ण क्षमतेने कार्यरत होते. या चाचणीत तज्ज्ञांच्या पथकाकडून ट्रॅकची कार्यक्षमता आणि सुरक्षितता, इलेक्ट्रिकल सिस्टीम, सिग्नलिंग आणि एकूणच ऑपरेशनल तत्परता तपासण्यासाठी विविध पैलूंचे परिक्षण करण्यात आले.
पुण्यातील नागरिकांना सुरक्षित, कार्यक्षम आणि आधुनिक सार्वजनिक वाहतूक उपलब्ध करून देण्याचा महामेट्रोचा निश्चयय आहे. आता सुरू असलेल्या मेट्रोला पुणेकर व पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांचा मिळालेला प्रतिसाद उत्साहवर्धक आहे. संपूर्ण मेट्रो लवकरच पूर्ण क्षमतेने सुरू होईल.
श्रावण हर्डीकर, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो