Pune Local Body Election Result 2025: बारामतीसह पाच नगर परिषदांसाठी ६३.२ टक्के मतदान
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 09:26 IST2025-12-21T08:57:15+5:302025-12-21T09:26:24+5:30
Pune Municipal Council Election Result 2025: नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गटांसह भाजप आणि शिंदेसेना, बहुजन समाज पार्टीच्या उमेदवारासह अन्य अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.

Pune Local Body Election Result 2025: बारामतीसह पाच नगर परिषदांसाठी ६३.२ टक्के मतदान
पुणे : बारामतीसह पाच नगर परिषदांसाठी शनिवारी ६३.२ टक्के इतके मतदान झाले असून, उमदेवारांचे भवितव्य मतदान पेटीत बंद झाले आहे. रविवारी मतमोजणी होणार आहे. दरम्यान, न्यायालयीन प्रक्रियेमुळे सासवड येथील एका जागेच्या निवडणुकीची स्थगिती कायम आहे. बारामती नगर परिषदेसाठी शहरात ११५ ठिकाणी मतदान केंद्रांवर मतदान पार पडले असून, ६६.९२ टक्के इतके मतदान झाले आहे. ४१ जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या ८ जागा यापूर्वीच निवडून आल्या आहेत. त्यामुळे नगराध्यक्षपद आणि ३३ नगरसेवकांच्या निवडीसाठी शनिवारी मतदान पार पडले. बारामतीत २० प्रभागांत नगरसेवकपदासाठी १४५ उमेदवार व अध्यक्षपदासाठी १४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामध्ये नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गटांसह भाजप आणि शिंदेसेना, बहुजन समाज पार्टीच्या उमेदवारासह अन्य अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.
फुरसुंगी–उरुळी देवाची नगर परिषद निवडणुकीसाठी ५९.७० टक्के एवढे मतदान झाले. सुरुवातीपासूनच काही मतदान केंद्रावर मतदानाचा वेग संथ असल्याचे चित्र दिसून आले. सकाळी मतदान सुरू झाल्यानंतर पहिल्या दोन तासांत केवळ ६ टक्के मतदान झाले होते. दौंड नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक ९ ‘अ’च्या एका जागेसाठी झालेल्या निवडणुकीत ४५.२५ टक्के शांततेत मतदान झाले. तर, तळेगाव दाभाडेतील पाच जागांसाठी ५७.४३ तर लोणावळा नगर परिषदेच्या दोन जागांसाठी ७०.२ टक्के इतके मतदान झाले आहे. सर्व ठिकाणी शांततेत मतदान पार पडले असून या नगर परिषदांची मतमोजणी आज होणार आहे. सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असून, या कामकाजाकरिता राखीव कर्मचारी मिळून एकूण ९१४ अधिकारी-कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. निकालाच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, याकरिता पुरेसा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.