पिंजऱ्यात कोंबडी ठार, पण बिबट्या फरार...! पुण्यातील बिबटे झाले हुशार ? वन विभागाच्या पिंजऱ्याला दिली हुलकावणी
By किरण शिंदे | Updated: December 10, 2025 16:16 IST2025-12-10T16:15:52+5:302025-12-10T16:16:31+5:30
वन विभागाने बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यांना चकवा देतानाचा हा व्हिडिओ असून सध्या तो सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

पिंजऱ्यात कोंबडी ठार, पण बिबट्या फरार...! पुण्यातील बिबटे झाले हुशार ? वन विभागाच्या पिंजऱ्याला दिली हुलकावणी
पुणे - जिल्ह्यातील बिबट्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.बिबट्यांना पकडण्यासाठी प्रशासनाकडून वेळोवेळी पाऊल उचलली जात आहे, मात्र आता हे बिबटे अधिकच सावध झाले की काय असं वाटायला लागल आहे. कारण हे बिबटे सावध झाल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. वन विभागाने बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यांना चकवा देतानाचा हा व्हिडिओ असून सध्या तो सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
हा व्हिडिओ जुन्नर तालुक्यातील वडगाव आनंद परिसरातील आहे. या परिसरातील वन विभागाने बिबट्यांसाठी सापळे लावले आहे. पिंजऱ्यांमध्ये आमिष म्हणून कोंबड्या ठेवण्यात आल्या होत्या. याच पिंजऱ्याजवळ एक बिबट आणि त्याचे दोन बछडे आले. पिंजऱ्याच्या आत असलेल्या कोंबडीची शिकार करण्यासाठी बिबट्याने पिंजऱ्यात पंजा टाकला. त्यानंतर कोंबडी आणि बिबट्यात काही वेळ झटापट झाली. आणि यात कोंबडी ठार झाली. हे सर्व होत असतानाच आपण पिंजऱ्यात अडकणार नाही याची खबरदारी घेताना हा बिबट्या या व्हिडिओत कैद झाला आहे.
यादरम्यान, एकही बिबट पिंजऱ्यात अडकला नाही. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पुण्यातील बिबटे केवळ आक्रमकच नाही तर हुशार आणि सावधही झालेत अशी चर्चा रंगली आहे.या व्हिडिओवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहे. त्यामुळे बिबटेही आता पिंजऱ्यांना ओळखू लागलेत का? वन विभागाच्या सापळ्यांनाही ते चकवा देतायत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
तत्पुर्वी, हवेली तालुक्यातील अष्टापूर येथील खोलशेत वस्ती परिसरात मंगळवारी (दि.९) पहाटे सव्वा पाचच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात महिला जखमी झाली. अंजना वाल्मीक कोतवाल असे जखमी महिलेचे नाव असून, त्यांच्यावर वाघोलीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.