पुणे: कल्याणीनगर येथील पोर्शे अपघात प्रकरणातील बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाला बाल न्याय मंडळाने ३०० शब्दांचा निबंध, १५ दिवस वाहतूक पोलिसांबरोबर काम करण्याचे आदेश देत काही तासांत त्याची जामिनावर मुक्तता केली होती. बाल न्याय मंडळाच्या या निर्णयानंतर सोशल मीडियासह राज्यभरात संतापाची लाट उसळली. दोन निष्पापांचा बळी घेणाऱ्या धनाढ्य बापाच्या मुलाला केवळ जुजबी शिक्षा दिल्याने राजकीय पक्षाच्या नेत्यांनीदेखील नाराजी व्यक्त केली. यानंतर आता पुण्यातील बाल न्याय मंडळात (जेजेबी) आता गुन्ह्याचे स्वरूप विचारात घेऊन जामीन दिला जात असल्याची माहिती वकिलांनी दिली.
पुण्यातील येरवडा भागात बाल न्याय मंडळ आहे. त्यात एक अध्यक्ष आणि दोन सदस्यांचा समावेश आहे. कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाला निबंध लिहिण्याच्या अटींवर १२ तासांत जामीन दिल्याने बाल न्याय मंडळावर विविध स्तरातून टीका झाली होती. त्यानंतर आता बाल न्याय मंडळातील सदस्यांकडून अल्पवयीन मुलांनी केलेल्या गुन्ह्यांचे स्वरूप विचारात घेऊन त्यांना जामीन दिला जात आहे. मुलांना बालसुधारगृहात ठेवून त्यांचे समुपदेशन केल्यानंतर जामिनावर सोडले जात आहे.
चोरी, दरोडा, विनयभंग आणि बलात्काराच्या गुन्ह्यात अल्पवयीन मुलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पोलिसांसाठीही तो चिंतेचा विषय आहे. अशा गुन्ह्यांमध्ये अटक केल्यानंतर या मुलांना तत्काळ जामिनावर न सोडता तीन ते चार दिवस बालसुधारगृहात ठेवून त्यांचे समुपदेशन केले जाते. त्यानंतर जामीन दिला जात असल्याची माहिती वकिलांनी दिली.
गुन्हा केल्यानंतर अल्पवयीन मुलाला बाल न्याय मंडळासमोर हजर केले जाते. आता अल्पवयीनांना त्वरित जामीन दिला जात नाही. बालसुधारगृहात ठेवले जाते. तेथे त्याचे समुपदेशन केल्यानंतर जामीन मंजूर केला जातो. - ॲड. यशपाल पुरोहित