पुणे : विसर्जन मिरवणुकीत यंदा बेलबाग चौकात पोलिसांच्या ढिसाळ नियोजनामुळे मिरवणुकीचा खोळंबा झाला. मिरवणुकीत आधी कुणाला सोडावे, ढोलताशा पथकांना किती वेळ वादन करू द्यावे, भाविकांना कोणत्या मार्गाने सोडावे, याचा पुरता बोजवारा उडाला. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची अनुपस्थिती, उपस्थित कनिष्ठ अधिकाऱ्यांना मिरवणुकीचा अनुभव नसणे यामुळे मिरवणुकीच्या उमगस्थानीच विलंभ झाल्याने वेळेत मिरवणूक संपवू, असा दावा करणारे पोलिस तोंडघशी पडले.
अनेक मंडळांनी चौकातच तब्बल एकेक तास वादन चालू ठेवल्याने मिरवणुकीचा वेग संथ झाला. शिवाय कुमठेकर रस्त्यावरून काही मंडळे मध्येच रांगेत शिरल्याने गोंधळ उडाला आणि मिरवणूक खोळंबली. लक्ष्मी रस्त्यावरून पुण्याच्या गणेश विसर्जन मिरवणुकीला खऱ्या अर्थाने प्रारंभ होतो.
सकाळी मानाचे पाच गणपती या रस्त्यावरून मार्गस्थ झाल्यानंतर उत्सुकता असते ती दगडूशेठ गणपती मंडळ ट्रस्ट, अखिल मंडई गणपती मंडळ, भाऊसाहेब रंगारी, जिलब्या मारुती, बाबू गेणू यासारख्या मंडळांच्या रथांची आणि त्यासोबत असलेल्या ढोलतासा पथकांच्या वादनाची. मानाच्या गणपतींसह, पुणे महापालिका सेवकांच्या मंडळाचा गणपती, त्वष्टा कासार अशी मंडळे मार्गस्थ झाल्यानंतर दुपारी चार वाजेपर्यंत केवळ दहा गणपती मंडळे बेलबाग चौकातून पुढे गेली होती. एरवी देल्या दोन वर्षांपासून दगडूशेठ मंडळाचा गणपती चारच्या ठोक्याला बेलबाग चौकात हजेरी लावत आहे. मात्र, यंदा ही वेळ चुकली. बेलबाग चौकातून लक्ष्मी रस्त्यावरून जाणा-या मंडळांमध्ये कुमठेकर रस्त्यावरील शगून चौकातून यंदा काही मंडळे मध्येच शिरल्याने मिरवणुकीला विलंब होण्यास सुरुवात झाली. येथूनच पोलिसांचे मिरवणुकीवरील नियंत्रण सुटत गेले.
एरवी त्वष्टा कासार मंडळानंतर दगडूशेठ मंडळाचा गणपती मार्गस्थ झाल्यानंतर दगडूशेठ गणपती रांगेत लागतो. मात्र, यंदा गजानन मित्रमंडळ ट्रस्ट दगडूशेठ मंडळाच्या पुढे शिरले. त्यामुळे दगडुशेठ मंडळ तब्बल ५५ मिनिटे उशिरा आले. त्यानंतर तब्बल एका तासाने महाराष्ट्र तरुण मंडळ चौकात दाखल झाले. मंडळांनी केलेला उशीर, त्यातच पोलिसांचे ढिसाळ नियोजन यामुळे विलंब आणखीच वाढत गेला. परिणामी दुपारी चार ते रात्री सातवाजेपर्यंत केवळ पाच मंडळे रांगेत लागली होती. सात वाजेपर्यंत एकूण १५ मंडळेच चौकातून मार्गस्थ झाली होती.