पुणे : राज्यभरात उत्साहात साजरा झालेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी ढोल वाजवत थेट जल्लोषात सहभाग घेतला. पुण्यातील मिरवणुकीदरम्यान त्यांनी पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात काही क्षण ताल धरला आणि उपस्थितांमध्ये उत्साह अधिकच वाढवला.
याआधी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात अजित पवार व त्यांच्या पत्नी यांनी अनंत चतुर्दशीची पूजा केली. “दहा दिवस अगदी कळलेही नाहीत. भक्तिभाव आणि श्रद्धेत सगळे रंगून गेले. आता गणरायाच्या कृपेने सर्वांच्या शांततेसाठी व आनंदासाठी प्रार्थना केली,” असे पवार म्हणाले.
विसर्जन मिरवणुकीदरम्यान नागरिकांनी पोलिस प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे व शिस्त राखून सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. दहा दिवसांच्या उत्सवानंतर अनंत चतुर्दशीला विघ्नहर्ता गणेशाच्या मूर्ती मोठ्या भक्तिभावाने व जल्लोषात नैसर्गिक व कृत्रिम जलाशयांमध्ये विसर्जित करण्याची परंपरा पार पडते.