पुणे - पुण्यात आज पहाटे दोन ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या असून सुदैवाने दोन्ही ठिकाणी कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पहिली घटना पुण्यातील प्रसिद्ध श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिराजवळ घडली.अधिकच्या माहितीनुसार, रात्री १.०६ वाजता आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला मिळताच तत्काळ १० अग्निशमन वाहने, ५ अधिकारी आणि ५० जवान घटनास्थळी रवाना झाले. मंदिराशेजारी असणाऱ्या एका दुमजली लाकडी वाड्याला भीषण आग लागली असून खाली असलेल्या दोन दुकानांनाही या आगीत नुकसान झाले आहे.अग्निशमन दलाच्या जवानांनी चारही बाजूंनी पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू ठेवला. आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. वेळीच ८-१० नागरिक बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला. पोलिस आणि महावितरणचे कर्मचारीही घटनास्थळी हजर आहेत.