पुणे : नशेत टॉवरवर चढलेल्या तरुणाची सुटका, अग्निशामक दलाच्या जवानांनी तासभराच्या प्रयत्नानंतर केली सुटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2017 21:12 IST2017-12-07T21:09:33+5:302017-12-07T21:12:06+5:30
नशेत इमारतीवरील मोबाईलवर चढलेल्या तरुणाची अग्निशामक दलाच्या जवानांनी तासभराच्या प्रयत्नानंतर सुटका केली़.

पुणे : नशेत टॉवरवर चढलेल्या तरुणाची सुटका, अग्निशामक दलाच्या जवानांनी तासभराच्या प्रयत्नानंतर केली सुटका
पुणे : नशेत इमारतीवरील मोबाईलवर चढलेल्या तरुणाची अग्निशामक दलाच्या जवानांनी तासभराच्या प्रयत्नानंतर सुटका केली़.
गणेश गालफाडे (वय ३२, रा़ कात्रजगाव) असे त्याचे नाव आहे़ कात्रज चौकात आयसीसी टॉवर आहे़ या आठ मजली इमारतीच्या वर मोबाईलचे टॉवर आहे़ गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास गणेश गालफाडे हा दारूच्या नशेत या टॉवरवर चढल्याचे लोकांच्या लक्षात आले़ मला आत्महत्या करायचा आहे़ मी उडी मारणार असे बरळू लागला होता़ हे समजल्यावर भारती विद्यापीठ पोलीस तातडीने तेथे पोहचले़ पोलिसांनी त्याला समजाविण्याचा प्रयत्न केला़ परंतु, तो ऐकायच्या मनस्थितीत नव्हता़ शिवाय उंचावरुन पडण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी अग्निशामक दलाला पाचारण केले.
अग्निशामक दलाचे अधिकारी प्रकाश गोरे यांनी सांगितले की, आम्ही देवदूत व रेस्क्यु व्हॅन घेऊन तेथे पोहचलो़ तेव्हा तो बरळत होता़ त्याचा कधीही हात सुटून पडण्याची शक्यता होती़ त्यामुळे तातडीने खाली जाळी तयार ठेवण्यात आली़ एका बाजूने काही जणांनी त्याला बोलण्यात गुंतवून ठेवले़ त्यावेळी इतरांनी दुस-या बाजूने चढून त्याच्याजवळ पोहचले व त्याच्या कमरेला दोरी बांधली़ त्यानंतर त्याला हलते ठेवण्यासाठी एका बाजूला सरकण्यास सांगितले़ तो सुरक्षित जागी येताच दोरी खेचून त्याला खाली घेण्यात आले़ त्याला सुरक्षितपणे खाली घेऊन पोलिसांच्या हवाली करण्यात आले.
गणेश गालफाडे याचे कात्रज चौकातच वडापावची गाडी असून त्याने ती भाड्याने दिली असल्याचे सांगण्यात येते़ दारूच्या नशेत त्याने हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले़