पुणे : माझ्या दुश्मनाबरोबर का फिरतो, असे म्हणत गुंडाने तीक्ष्ण हत्याराने एका तरुणाच्या डोक्यावर, छातीवर, हातावर वार करून त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना बुधवार पेठेतील क्रांती चौकात सोमवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास घडली.
या प्रकरणी फरासखाना पोलिसांनी हर्षल खुळे या गुंडासह त्याच्या साथीदारांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात गणेश कांबळे (वय २७, रा. गवळी आळी, बुधवार पेठ) याने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कांबळे हा सोमवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास बुधवार पेठेतील क्रांती हाॅटेल चौकातून जात होता. त्या वेळी खुळे आणि त्याचे साथीदार दुचाकीवरून तेथे आले. त्यांनी अली इराणीबरोबर का राहतो? अशी विचारणा करीत कांबळे याच्या चेहऱ्यावर स्प्रे मारला.
स्प्रे मारल्याने त्याला समोरचे काही दिसेना, त्यानंतर खुळे आणि साथीदारांनी कांबळे याच्या डोक्यावर, छातीवर, हातावर वार केले. या हल्ल्यात कांबळे गंभीर जखमी झाल्याने त्याला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी फरासखाना पोलिसांत खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास उपनिरीक्षक संतोष गोरे करीत आहेत.