सोमेश्वरनगर : वेश्या व्यवसायाच्या जाळ्यात अडकवण्यासाठी जबरदस्तीने दोन महिलांना चारचाकी वाहनातून नेत असताना वडगाव निंबाळकर पोलिसांनी मोठी कारवाई करत त्यांची सुटका केली आहे. या प्रकरणी दोन सराईत आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडील स्विफ्ट गाडी (क्र. एमएच ११ एमडी ८०५५) जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई १५ सप्टेंबर २०२५ रोजी करंजेपूल बस स्टॉप परिसरात करण्यात आली.
पोलिस पथक पेट्रोलिंग करत असताना लाल रंगाची काळ्या काचांची संशयास्पद गाडी फिरत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तत्काळ नाकाबंदी करून गाडी थांबवली. गाडीची तपासणी केली असता त्यात दोन पुरुष आणि दोन महिला आढळल्या. महिला पोलिस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली असता, पीडित महिलांनी सांगितले की, त्यांना पैशांचे आमिष दाखवून पुण्यातील हडपसर येथून बेकायदेशीरपणे लोणंद येथे आणले गेले.
आरोपी त्यांना जबरदस्तीने वेश्या व्यवसायात ढकलण्याचा प्रयत्न करत होते. यापूर्वीही त्यांना अशाच प्रकारे लोणंद परिसरात आणून अवैध व्यवसायास भाग पाडले गेले होते. या प्रकरणी पोलिसांनी सुयोग हिंदुराव खताळ (रा. कापडगाव, लोणंद, ता. फलटण, जि. सातारा) आणि प्रीतम अप्पासाहेब घुले (रा. कापडगाव, लोणंद, ता. फलटण, जि. सातारा) यांना अटक केली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, प्राथमिक तपासातून या प्रकरणात मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.