पुणे : सिंहगड रस्त्यावरील राजाराम पूल चौक ते फन टाइम थिएटर यादरम्यान नव्याने उभारण्यात आलेला उड्डाणपूल नियोजित मेट्रो मार्गासाठी ६६ ठिकाणी फोडला जाणार आहे. हे काम पुढील काही महिन्यात सुरू होण्याची शक्यता असताना, या उड्डाणपुलाच्या विद्युतरोषणाईसाठी १ कोटी ८० लाखांचा खर्च करण्याचा घाट पुणे महापालिकेच्या विद्युत विभागाने घातला आहे. या प्रस्तावाला महापालिकेच्या स्थायी समितीने नुकताच मंजुरी दिली आहे.
सिंहगड रस्ता (नरवीर तानाजी मालुसरे रस्ता) परिसरातील वडगाव, धायरी, नऱ्हे, खडकवासला या गावांचा झपाट्याने विकास होत आहे. शिवाय, सिंहगड, खानापूर, पानशेत या परिसरातूनही शहरात ये-जा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र, सिंहगड रस्त्याला दुसरा पर्यायी मार्ग नसल्यामुळे दिवसेंदिवस वाहतूक कोंडी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने राजाराम पूल ते फन टाइम थिएटर यादरम्यान दोन उड्डाणपूल उभारले आहेत. एक उड्डाणपूल राजाराम चौकाजवळ आणि दुसरा विठ्ठलवाडी ते फन टाइम थिएटरदरम्यान आहे. या उड्डाणपुलांचे काही टप्पे आधीच वाहतुकीसाठी खुले झाले आहेत. माणिकबाग ते विठ्ठलवाडी या उड्डाणपुलाचा शेवटचा टप्पाही नुकताच वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.
दरम्यान, खडकवासला ते हडपसर या नियोजित मेट्रो प्रकल्पाला केंद्र सरकारने अलीकडेच मंजुरी दिली आहे. नियोजित मेट्रो मार्ग सिंहगड रस्त्यावरूनच जाणार असल्याने उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंच्या रॅम्पमध्ये मेट्रोच्या पिलरची उभारणी करण्यात आली आहे. मात्र, उड्डाणपुलादरम्यान येणाऱ्या मेट्रो पिलरसाठी उड्डाणपूल ६६ ठिकाणी फोडला जाणार आहे. हे कामही पुढील काही महिन्यांत सुरू होणार आहे.
येत्या मेट्रो कामांच्या पार्श्वभूमीवर उड्डाणपुलावर केले जाणारे विद्युतरोषणाईचे काम महापालिकेच्या विद्युत विभागाने सुरू ठेवले आहे. या कामासाठी १ कोटी ७९ लाख २५ हजार ९२ रुपयांच्या खर्चासाठी निविदा काढण्यात आल्या असून, या निविदेला शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
Web Summary : Despite planned demolition for metro, Pune approves ₹2 crore for Singhagad flyover lighting. The flyover will be broken for the metro project.
Web Summary : मेट्रो के लिए नियोजित विध्वंस के बावजूद, पुणे ने सिंहगढ़ फ्लाईओवर प्रकाश व्यवस्था के लिए ₹2 करोड़ मंजूर किए। फ्लाईओवर को मेट्रो परियोजना के लिए तोड़ा जाएगा।