ओतूर - जुन्नर तालुक्यातील ओतूर आठवडे बाजारात चोरीच्या प्रयत्नात पकडलेल्या आरोपीला न्यायालयीन कस्टडीत पाठवण्यात आले असून, त्याची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. ही माहिती ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांनी दिली.
गेल्या काही महिन्यांपासून ओतूर आठवडे बाजारात मोबाईल चोरीच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण संदीप गिल्ल यांच्या सूचनेनुसार, पोलीस निरीक्षक लहू थाटे यांनी गुरुवारी साध्या गणवेशातील पोलिसांचे विशेष पथक तयार करून बाजारात गस्त घालण्याचे आदेश दिले होते. गुरुवारी पानसरे आळी येथे गस्त घालत असताना, एक तरुण वयोवृद्ध व्यक्तीच्या खिशातील मोबाईल चोरी करण्याचा प्रयत्न करताना आढळून आला. बाजारातील नागरिकांनी त्याला पकडले व पोलिसांकडे सोपवले. दरम्यान, आरोपीचे नाव मोनिया कनई दास (वय १९, रा. जाजपूर टाऊन, जिल्हा जाजपूर, ओडिशा) असे समोर आले. त्याने मनोहर गेनभाऊ नलावडे यांचा मोबाईल चोरी करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी ओतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवार, १८ जुलै रोजी आरोपीला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, जुन्नर यांच्यासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्याला न्यायालयीन कस्टडी सुनावली. त्यानुसार त्याची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.