पुणे - शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार सागर जाधव यांच्याविरोधात गंभीर स्वरूपाची तक्रार पोलीस आयुक्तांकडे दाखल करण्यात आली आहे. लाच व खंडणीच्या आरोपांमुळे हे प्रकरण सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
तक्रारदार विजय मल्लिकार्जुन कोळी यांनी दिलेल्या तक्रार अर्जानुसार, त्यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात मदत करण्याच्या बहाण्याने हवालदार सागर जाधव यांनी पैशांची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, विजय कोळी याला ‘गेट जामीन’ मिळवून देण्याचे आमिष दाखवत सागर जाधव यांनी त्याचा मित्र रमेश धनगर याच्यावर दबाव टाकला आणि त्याच्याकडून २ लाख २५ हजार रुपये घेतले. विशेष म्हणजे, हे पैसे शिवाजीनगर पोलीस ठाण्यासमोरील ‘अजीज पान शॉप’ येथे घेतल्याचा आरोप आहे.
याशिवाय, विजय कोळीचा दुसरा साथीदार विशाल काळे याला अटक करण्याची धमकी देत त्याच्याकडूनही २ लाख ५० हजार रुपये उकळण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. अशा प्रकारे सागर जाधव यांनी एकूण जवळपास ५ लाख रुपये उकळल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तक्रारीत आणखी धक्कादायक बाब समोर आली असून, सागर जाधव यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना केवळ १ लाख रुपये घेतल्याचे सांगितले. यातील काही हिस्सा त्याने वरिष्ठांना दिल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात संबंधितांवर लाच व खंडणीचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, तसेच दोषी आढळणाऱ्या सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना बडतर्फ करावे, अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.
दरम्यान, सागर जाधव याला शिवाजीनगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत ‘वसुली भाई’ म्हणून ओळखले जाते. यापूर्वी तो खडकी पोलीस ठाण्यात कार्यरत असताना देखील अशाच प्रकारच्या चर्चेत होता, असेही तक्रारीत नमूद आहे.विशेष म्हणजे, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी यापूर्वी वसुलीप्रकरणी कठोर भूमिका घेत संबंधित कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या आणि अशा प्रकारांना आळा घालण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. मात्र, या आदेशांकडे दुर्लक्ष करून सागर जाधव याने मागील वर्षभरापासून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अशाच प्रकारे कारभार सुरू ठेवल्याचा आरोप आहे. आता या प्रकरणात पोलीस आयुक्तांकडून सखोल चौकशी होऊन सत्य बाहेर येते का आणि दोषींवर कारवाई होते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Web Summary : Pune constable Sagar Jadhav faces extortion allegations. A complainant claims Jadhav took ₹5 lakh, promising legal help in a gambling case. Jadhav is known as 'Vasuli Bhai' in the area. The Police Commissioner is investigating.
Web Summary : पुणे के कांस्टेबल सागर जाधव पर वसूली का आरोप है। शिकायतकर्ता का दावा है कि जाधव ने जुआ मामले में कानूनी मदद का वादा करके ₹5 लाख लिए। जाधव इलाके में 'वसूली भाई' के नाम से जाने जाते हैं। पुलिस आयुक्त जांच कर रहे हैं।