पुणे - खराडी येथील स्टे बर्ड नावाच्या हॉटेलमध्ये सुरू असलेल्या ड्रग्ज पार्टीवर २७ जुलै रोजी पहाटे पुणेपोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली. मात्र या कारवाईबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत असून, ही कारवाई संशयास्पद असल्याचे चित्र समोर येत आहे.या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी दि. ३० जुलै रोजी पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेऊन छाप्याचे व्हिडीओ फुटेज आणि फोटो कोणी व्हायरल केले, याचा सखोल तपास करण्यात यावा, अशी मागणी केली.आज (२ ऑगस्ट) पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना रोहिणी खडसे यांनी महायुती सरकारवर टीका केली. त्या म्हणाल्या, सरकारविरोधात बोलणाऱ्यांवर कारवाई केली जाते, हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे. विरोधी पक्षातील नेत्यांना लक्ष्य केलं जातं. आम्ही योग्य वेळी, योग्य ठिकाणी आमची बाजू मांडणार आहोत. आपण पक्ष संघटनाबाबत शरद पवार यांची भेट घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्या पुढे म्हणाल्या, पुणे पोलिसांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी दिली आहेत. मात्र, आता हा विषय न्यायप्रविष्ट असल्यामुळे मी न्यायालयीन प्रक्रियेवर काही बोलणार नाही. योग्य वेळी पत्रकार परिषद घेऊन माझी भूमिका स्पष्ट करणार आहे.रोहिणी खडसे यांच्या या वक्तव्यामुळे खराडी ड्रग्ज पार्टी प्रकरणात नवा वळण येण्याची शक्यता असून, कारवाईमागचे राजकीय संदर्भ आणि फुटेज व्हायरल होण्यामागचे नेमके कारण याची चौकशी होणे आवश्यक आहे, अशी मागणी आता जोर धरत आहे.