दौंड : दौंड तालुक्यातील बोरीबेल ते काळेवाडी दरम्यान विनापरवाना कोळशाची वाहतूक करणाऱ्या पिकअप वाहनासह ३९ कोळशाच्या गोण्या असा एकूण ११ लाख २० हजार रुपयांचा ऐवज वन विभागाने जप्त केला आहे. याप्रकरणी शिरापूर (ता. दौंड) येथील दिलीप सांगळे याच्यावर वन गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती दौंडचे वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांनी दिली.
बोरीबेल ते काळेवाडी दरम्यान पांढऱ्या रंगाच्या पिकअप वाहनातून (क्र. एम.एच.१४ एफ.टी.०१०४) बेकायदेशीर कोळशाची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांना मिळाली होती. त्यानुसार, त्यांनी सापळा रचून संबंधित वाहनाला अडवले. तपासणीत २० हजार रुपये किमतीच्या ३९ कोळशाच्या गोण्या आणि ११ लाख रुपये किमतीचे पिकअप वाहन असा एकूण ११ लाख २० हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. कोळशाची वाहतूक करण्यासाठी वन खात्याचा परवाना आवश्यक असतो. मात्र, या प्रकरणात परवानगी न घेतल्याने बेकायदेशीर वाहतूक होत असल्याचे आढळले. त्यामुळे वन विभागाने ही कारवाई केली.
या कारवाईत वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे, वनरक्षक शुभांगी मुंडे, वनकर्मचारी शरद शितोळे यांच्यासह इतर कर्मचारी सहभागी झाले होते. या प्रकरणाची सुनावणी पुणे येथील वन विभागाचे सहायक वन संरक्षक विशाल चव्हाण यांच्याकडे होणार आहे. तसेच, कोणीही बेकायदेशीर कोळसा वाहतूक किंवा वन खात्याच्या जमिनीतून मुरूम उपसा करू नये, अन्यथा कडक कारवाई केली जाईल, असा इशारा वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांनी दिला आहे.