आव्हाळवाडी : वाघोली वाहतूक विभागाने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५१ डंपरवर दंडात्मक कारवाई करून ताब्यात घेतले आहे. दरम्यान, ६ लाख ८९ हजार १२० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई ७ ते ९ मे या कालावधीत विशेष मोहीम राबवून करण्यात आली.
कारवाईदरम्यान जप्त केलेल्या डंपरमधून मर्यादेपेक्षा जास्त वजनाची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. संबंधित वाहनांवर प्रादेशिक परिवहन विभागाच्या सहकार्याने मोटार वाहन कायद्यानुसार कलम १९४(१), टॅक्स पेंडिंग १२-बी, पीयूसी, इंडिकेटर मार्किंग, नो एन्ट्री उल्लंघन अशा विविध कारणांवरून दंडात्मक कारवाई करण्यात आली.
तसेच, डंपर चालकांना माल भरल्यानंतर आच्छादन टाकणे, नो एन्ट्रीमध्ये प्रवेश न करणे आणि वाहतुकीचे नियम पाळणे याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. यापुढेही नियमभंग करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही वाघोली वाहतूक विभागाने दिला आहे.