पुणे : चालकाला जीवे मारण्याची धमकी देऊन त्याच्याकडून चावी घेऊन ५० लाखांचा ट्रक चोरणाऱ्या दोघांना लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे. मल्लिकार्जुन शांताप्पा अवंती (३३) आणि अशोक शिवाप्पा राठोड (३९, दोघेही रा. विजापूर, कर्नाटक) अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अनुजकुमार रामसुरत (२४, रा. उत्तर प्रदेश) याने फिर्याद दाखल केली आहे.
फिर्यादी अनुजकुमार हा ट्रक चालक असून, तो बुधवारी रात्री एकच्या सुमारास पुणे-सोलापूर महामार्गाने ट्रक घेऊन जात होता. त्यावेळी महामार्गालगतच्या बालाजी सिमेंट वेअर हाउसजवळ आल्यानंतर मल्लिकार्जुन आणि अशोक राठोड यांनी चालकाला जीवे मारण्याची धमकी देऊन त्याच्याकडील ट्रकची चाकी घेतली.
५० लाखांचा ट्रक चोरून नेला. याप्रकरणी अनुजकुमारने पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने दोघा आरोपींचा माग काढून त्यांना अटक केली. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक कृष्णा बाबर तपास करीत आहेत.