पुणे : पादचारी ज्येष्ठ नागरिकांकडे बतावणी करून चोरट्यांनी त्यांच्याकडील सोन्याची अंगठी लांबवल्याची घटना भारती विद्यापीठ भागात घडली. या प्रकरणी चोरट्यांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दोन चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ७० वर्षीय ज्येष्ठ नागरिक हे धनकवडी भागात राहायला आहेत. १ ऑक्टोबर रोजी ते दुपारी दोनच्या सुमारास भारती विद्यापीठ भागातून निघाले होते. त्यावेळी चोरट्यांनी त्यांना अडवले. ‘आम्हाला सूतक आहे. जवळच्या मंदिरात दान करायचे आहे’, अशी बतावणी चोरट्यांनी त्यांच्याकडे केली. त्यानंतर चोरट्यांनी बोलण्यात गुंतवून ज्येष्ठाकडील अंगठी काढून घेतली. त्यांच्याकडील अंगठी चोरून चोरटे पसार झाले. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी करत आहेत.