पुणे - गुडीपाडव्याच्या दिवशी पुण्यात माजी महापौरांच्या बंगल्याबाहेर भयंकर प्रकार घडला आहे. धनकवडी पुणे सोसायटीमध्ये मागील चार महिन्यापासुन फक्त अमावस्याच्या दिवशी वेगवेगळया व्यक्तीच्या घराच्यासमोर नारळ, दही-भात, उकडलेली अंडी, लिंबु, काळा अभिर ठेवल्याचे आढळले होते. यामुळे परिसरातील स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिसरात जादूटोना होत असल्याची तक्रारही पोलिसांना मिळाली होती. अशात आज पोलिसांनी एका महिलेला या प्रकरणात अटक केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला धनकवडी परिसरातील एका सोसायटीमध्ये गेल्या चार महिन्यापासून फक्त अमावस्याच्या दिवशी वेगवेगळया व्यक्तीच्या घराचे समोर नारळ, दही-भात, उकडलेली अंडी, लिंबु, काळा अभिर ठेवत होती तसेच शनिवार २९ तारखेला रात्री ८ च्या सुमारास अमावस्याच्या दिवशी पुन्हा एकदा असाच प्रकार या महिलेने केला. सदर महिला हिने दत्ता धनकवडे यांच्या बंगल्याचे समोर नारळ, दही-भात, उकडलेली अंडी, लिंबु, काळा अभिर ठेवला. यावेळी परिसरातील लोकांनी तिला रस्त्यावर नारळ, दही-भात, उकडलेली अंडी, लिंबु, काळा ठेवतांना बघितले. आणि पोलिसांना संपर्क साधला. पोलिसांनी तत्परता दाखवत घटनास्थळी पोहचत महिलेला अटक केली. दरम्यान, सहकारनगर पोलीस ठाण्यात जादूटोणा प्रतिबंधक कायद्याखाली या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी विवेक नामदेव पाटील (वय ६२) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी महिला मागील चार महिन्यांपासून विद्यापीठ गृहसंस्था मर्यादित संकुलात रात्रीच्या वेळी संशयास्पद विधाने करत होती. ज्यामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम २०१३ च्या कलम ३ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास सहकारनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल गोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
'नारळ, दही-भात, उकडलेली अंडी...' पुण्यात माजी महापौरांच्या बंगल्याबाहेर जादूटोणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 16:32 IST