पुण्यात मध्यरात्री २ तास गावगुंडांचा धुमाकूळ; रिक्षा, कार, स्कूल बससह २० ते २५ वाहनांची तोडफोड
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 07:45 IST2025-07-23T07:45:15+5:302025-07-23T07:45:31+5:30
Pune Crime News: धनकवडीत मध्यरात्री दहशत! १५ रिक्षा, ३ कार, २ स्कूल बसची तोडफोड; दोघांवर वार

पुण्यात मध्यरात्री २ तास गावगुंडांचा धुमाकूळ; रिक्षा, कार, स्कूल बससह २० ते २५ वाहनांची तोडफोड
सहकार नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या धनकवडी परिसरात मंगळवारी मध्यरात्री गोंधळाची आणि दहशतीची घटना घडली आहे. केशव कॉम्प्लेक्स, सरस्वती चौक, आणि नवनाथ नगर या भागात तीन अज्ञात व्यक्तींनी वाहनांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली. ही घटना 23 जुलै रोजी रात्री 11.45 ते 1 वाजेच्या दरम्यान घडली.
पोलीसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, अज्ञात हल्लेखोरांनी एकूण 15 ऑटो रिक्षा, 3 कार, 2 शालेय बस, आणि 1 पियाजिओ टेम्पो यांची काचफोड करत मोठे नुकसान केले आहे. हे गुन्हेगार वाहनांच्या रस्त्यावर असलेल्या पार्किंगवर तुफान हाणामारी करत फिरत होते. त्याचवेळी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन नागरिकांना देखील मारहाण करून जखमी करण्यात आले. या दोघांना तत्काळ उपचारासाठी कामे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच सहकारनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. सध्या डीबी शाखा आणि स्थानिक पोलीस अधिकारी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून, आरोपींची ओळख पटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिक नागरिकांनी पोलीस प्रशासनाकडे रात्री गस्त वाढवण्याची मागणी केली आहे.