पुणे : प्रेम संबंध असताना दुसऱ्या मुलीबरोबर प्रेम संबंध ठेवणाऱ्या तरुणाविरोधात तक्रार करायला गेलेल्या तरुणीला मारहाण करून तिची बदनामी करण्याची धमकी दिली. या मारहाणीत कानावर फटका बसल्याने तिच्या कानाचा पडदा फाटला. याबाबत सदाशिव पेठेत राहणाऱ्या २६ वर्षीय तरुणीने समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी सौरभ सोनवणे (रा. श्रीवर्धन अपार्टमेंट, हिंगणे खुर्द), राजेश पवार (रा. नाना पेठ), मनिषा पवार (रा. नाना पेठ) आणि मंदाकिनी सोनावणे (रा. श्रीवर्धन अपार्टमेंट, सिंहगड रोड) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.हा प्रकार नाना पेठ पोलिस चौकीशेजारील एका दुकानात १३ जुलै रोजी सायंकाळी चारच्या सुमरास घडला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी सौरभ सोनवणे हे एकत्र शिक्षण घेत होते. तेव्हापासून त्यांची ओळख, मैत्री व प्रेमसंबंध होते. सौरभ याने फिर्यादीला लग्नाचे वचन दिले होते. बरेच दिवस त्याचा फोन आला नव्हता. सौरभ हा रेवती या मुलीसोबत प्रेमसंबंधात असल्याची कुणकुण फिर्यादीला लागली होती. त्यामुळे त्यासंबंधी तक्रार देण्यासाठी ती १२ जुलै रोजी समर्थ पोलिस ठाण्यात गेली होती. हे समजल्यावर सौरभ व त्याची आई मंदाकिनी या तेथे आल्या. त्यांनी गोड बोलून तू तक्रार देऊ नको, असे सांगितले. त्यामुळे तरुणी तक्रार न देता घरी जात होती, तेव्हा वाटेत मंदाकिनी सोनवणे हिने माझ्या माणसांना सांगून तुझा बंदोबस्त कसा करायचा जेणेकरून तू घराबाहेर पडू शकणार नाही, हेच मी बघते, अशी धमकी दिली.त्यानंतर १३ जुलै रोजी दुपारी तरुणीला सौरभ व रेवती हे बाहेर फिरायला निघाले असल्याचे समजले. त्यामुळे सायंकाळी चारच्या सुमारास तरुणी पोलिस चौकीशेजारी असलेल्या शंकर पवार सिट कव्हर या दुकानात गेली. तेव्हा आधीचा राग मनात धरून सौरभ सोनवणे याने हाताने व हातातील कड्याने तिला जबर मारहाण केली. त्यात तरुणीच्या कानाला व चेहऱ्याला दुखापत झाली. त्यावेळी राजेश पवार व मनिषा पवार यांनी सौरभ याच्या प्रेमसंबंधात मध्ये येऊ नकोस, तुला माहिती आहे का मी कोण आहे, तुला घरी जिवंत जायचे आहे ना, असे म्हणून बघून घेण्याची तसेच तुझी बदनामी करेन, अशी धमकी देऊन शिवीगाळ केली.सौरभ याने केलेल्या मारहाणीमुळे तरुणीच्या कानाचा पडदा फाटल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सौरभ सोनवणे याने हॉस्पिटलचा सर्व खर्च करेल, असे सांगितले होते, पण पूर्ण खर्च त्याने केला नाही. तरुणीच्या कानाला झालेली दुखापत गंभीर स्वरूपाची असल्याने धमकावणाऱ्या व मारहाण करणाऱ्याविरोधात तिने फिर्याद दिली. पोलिस उपनिरीक्षक जाधव पुढील तपास करत आहेत.
तुला माहिती आहे का ? मी कोण आहे? प्रेम संबंधाबाबत तक्रार करायला गेलेल्या तरुणीला केली मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 17:41 IST