पुणे : मित्राबरोबर अनैतिक संबंध असल्याने महिलेवर चाकूने वार करून खून करण्यात आल्याची घटना नगर रस्त्यावरील वाडेबोल्हाई परिसरात घडली. या प्रकरणी लोणीकंद पोलिसांनी महिलेच्या नवऱ्याला अटक केली. नम्रता शैलेंद्र व्हटकर ऊर्फ नम्रता चंद्रशेखर इंगळे (वय १९) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी शैलेंद्र प्रकाश व्हटकर (३०, रा. बकोरी, ता. हवेली) यास अटक करण्यात आली. याबाबत शाहरूख दस्तगीर पठाण (२३, रा. बालाजी सोसायटी, वाडेबोल्हाई) याने लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शाहरूख पठाण आणि नम्रता व्हटकर दोन महिन्यांपासून एकत्र राहत होते. नम्रता आणि पठाण हे नगर रस्त्यावरील एका खासगी कंपनीत कामाला होते. तेथे दोघांची ओळख झाली. दोन वर्षांपूर्वी नम्रताचे शैलेंद्र व्हटकर याच्याशी लग्न झाले होते. नम्रता आणि पठाण यांच्यात अनैतिक संबंध असल्याची कुणकुण शैलेंद्र याला लागली होती. त्यानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाले. दोन महिन्यांपूर्वी नम्रता शैलेंद्रशी भांडण करून पठाण याच्याकडे राहण्यास आली होती.
लग्नात दिलेले नम्रताचे सोन्याचे दागिने शैलेंद्रकडे होते. तिने त्याच्याकडे दागिने परत करण्याची मागणी केली होती. गुरुवारी (दि. २२) पठाण कामानिमित्त शिरूर येथे गेला होता. रात्री आठच्या सुमारास तो घरी परतला, तेव्हा शैलेंद्र याला दागिने परत करण्यास सांगितले आहे, असे तिने पठाणला सांगितले. त्यानंतर शैलेंद्रच्या मोबाइल नंबरवर त्यांनी संपर्क साधला. नम्रता आणि पठाण यांना शैलेंद्रने नगर रस्त्यावरील वाडेबोल्हाई मंदिराजवळ बोलवले. पठाणचा मित्र हरीश कोळपे तेथे आला होता.
शैलेंद्रने नम्रताच्या मोबाइल नंबरवर संपर्क साधला. तिला जोगेश्वरी हायस्कूलजवळ त्याने बोलवले. नम्रता पठाणची दुचाकी घेऊन तेथे गेली. दोघांमध्ये तेथे वाद झाला. वादातून शैलेंद्रने नम्रतावर चाकूने वार केले. नम्रताचा ओरडण्याचा आवाज पठाणने ऐकला. त्यानंतर पठाणने तेथे जात नम्रताला खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त सोमय मुंडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या शैलेंद्र याला अटक करण्यात आली. गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक खेडकर पुढील तपास करत आहेत.