पुणे : पती - पत्नी दोघेही क्लास १ अधिकारी असूनही पतीने पत्नीच्या खाजगी जीवनावर पाळत ठेऊन तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीने घरात गुप्तपणे स्पाय कॅमेरे बसवून पत्नीचे अंघोळ करतानाचे तसेच इतर खाजगी क्षणांचे व्हिडिओ रेकॉर्ड केले. त्यानंतर हे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत माहेरून दीड लाख रुपये आणि कारच्या हप्त्याकरिता पैसे आणण्याची जबरदस्ती केली.अधिकच्या माहितीनुसार, ३० वर्षीय पीडित पत्नीनं आंबेगाव पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत सांगितले की, २०२० साली तिचे लग्न झाले असून, त्यानंतर सतत तिच्यावर मानसिक आणि शारीरिक अत्याचार सुरू आहेत. पतीकडून तिच्या चारित्र्यावर संशय घेतला जात असे आणि त्यातून शिवीगाळ, मारहाण आणि अपमानजनक वागणूक दिली जात होती.पतीने गुप्त कॅमेऱ्यांमधील व्हिडिओचा गैरवापर करून तिला धमकावले. "माहेरून पैसे आण, नाहीतर हे व्हिडिओ व्हायरल करेन," अशा धमक्या देत आर्थिक त्रासही देण्यात आला. या प्रकरणी पतीसह सासू, सासरे, दीर आणि इतर नातेवाईक अशा सात जणांविरुद्ध आंबेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तांत्रिक पुरावे, व्हिडिओ फुटेज आणि इतर तपशीलांची तपासणी सुरू केली असून, आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती दिली.
क्लास १ ऑफिसरची विकृती..! पत्नीच्या अंघोळीचे व्हिडिओ रेकॉर्ड करून केलं ब्लॅकमेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 15:06 IST