पुणे : पिस्तुलाचा धाक दाखवत हॉटेल व्यावसायिकाकडून दरमहा पाच हजार रुपयांची खंडणी उकळणाऱ्या कुख्यात गुंड रिजवान ऊर्फ टिपू सत्तार पठाण आणि त्याच्या टोळीवर काळेपडळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या वर्षभरापासून हा प्रकार सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
मोहम्मदवाडी परिसरातील ५४ वर्षीय हॉटेल व्यावसायिकाने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी रिजवान ऊर्फ टिपू सत्तार पठाण (रा. ख्वाजा मंझिल, सय्यदनगर, हडपसर), तन्वीर शकील शेख, इरफान नासीर शेख, अजित ऊर्फ अंट्या महमंद हुसेन शेख, सद्दाम सलीम पठाण (सर्व रा. सय्यदनगर, हडपसर) तसेच अन्य तीन ते चार साथीदारांविरोधात खंडणी व धमकीचा गुन्हा नोंदवला आहे. हा प्रकार १ जानेवारी २०२४ ते १२ जानेवारी २०२५ या कालावधीत घडल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
फिर्यादी यांचे गुलामअलीनगर, मोहम्मदवाडी येथे गेल्या सात वर्षांपासून हॉटेल आहे. जानेवारी २०२४ मध्ये तन्वीर शेख हा हॉटेलमध्ये येऊन ‘तुमचा धंदा चांगला चालला आहे, त्यातील नफा टिपू भाईला द्यावा लागेल, नाहीतर हॉटेल चालू देणार नाही,’ अशी धमकी देऊन गेला. त्यानंतर टोळीतील सदस्य वारंवार येऊन खंडणीची मागणी करू लागले. काही दिवसांनी तन्वीर शेख आणि इम्रान अफजल शेख हॉटेलमध्ये आले. त्यांनी टिपू पठाण यांच्याशी फोनवरून फिर्यादीची बोलणी लावली. ‘माझे अशरफ कुरेशी आणि मजर कुरेशी यांच्यासोबत मटण दुकान आहे. हॉटेलसाठी मटण आमच्याकडूनच घ्यावे, अन्यथा महिन्याला ५ हजार रुपये द्यावे लागतील,’ अशी मागणी करण्यात आली.
१२ जानेवारी रोजी तन्वीर शेख यांनी फिर्यादीला ख्वाजा मंझिल येथील ऑफिसमध्ये बोलावले. तेथे टिपू पठाण आणि त्याचे साथीदार उपस्थित होते. यावेळी टिपू पठाण याने टेबलच्या ड्रॉवरमधून पिस्तूल काढून ‘माझं ऐकलं नाही तर गोळी घालून ठार करीन,’ अशी धमकी दिली. तसेच दरमहा ५ हजार रुपये खंडणी आणि त्यांच्या गँगकडूनच मटण खरेदी करण्याचा दबाव टाकला. नकार दिल्यास हातपाय तोडण्याची धमकीही देण्यात आली.
जीवाच्या भीतीने फिर्यादीने त्याच दिवशी ५ हजार रुपये दिले आणि पुढील काळात दरमहा रक्कम देत राहिले. यापूर्वी जमीन बळकावणे आणि जिवे मारण्याची धमकी यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई झाली असून, नुकताच त्यांना जामीन मिळाला आहे. त्यानंतर हा नवीन गुन्हा समोर आला आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
Web Summary : Tipu Pathan and his gang extorted ₹5,000 monthly from a hotelier in Pune by brandishing a pistol. They face charges of extortion and intimidation after threatening the victim at his office and demanding he purchase meat from their shop.
Web Summary : पुणे में टिपू पठान और उसके गिरोह ने एक होटल व्यवसायी से बंदूक दिखाकर ₹5,000 मासिक उगाही की। उन पर जबरन वसूली और धमकी देने के आरोप लगे हैं, उन्होंने पीड़ित को ऑफिस में धमकाया और उनकी दुकान से मांस खरीदने की मांग की।