लोणी काळभोर - लोणी स्टेशन परिसरात घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला लोणी काळभोर पोलिसांनी मध्य प्रदेशातील खंडवा येथून अटक केली आहे. आरोपीकडून चोरीस गेलेला ६ लाख ३९ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे, अशी माहिती लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दिली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पठारे वस्ती येथील रहिवाशी शौकत शब्बीर मोगल हे खाजगी कामानिमित्त बार्शी येथे गेले होते. दोन दिवसांनी घरी परतल्यानंतर त्यांना घराचे कुलूप तोडलेले आढळले. अज्ञात चोरट्याने तिजोरी फोडून सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि एक मोबाईल फोन असा किमती मुद्देमाल चोरला होता. याबाबत त्यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.पोलिसांनी तपास पथक नेमून तपास सुरू केला. तांत्रिक माहिती आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिस अंमलदार पाटील आणि शैलेंद्र कुदळे यांना आरोपी प्रतिक हिराचंद लिडकर (वय ३१, रा. शिवमंदिर शेजारी, रामनगर, खंडवा, मध्य प्रदेश) याने ही चोरी केल्याचे निष्पन्न झाले. लोणी काळभोर पोलिसांनी खंडवा येथे सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडून चोरीस गेलेला सर्व मुद्देमाल हस्तगत केला. अटकेतील आरोपीवर मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात चोरी, जबरी चोरी आणि घरफोडीचे एकूण १५ गंभीर गुन्हे दाखल आहेत.
लोणी काळभोर येथील घरफोडीच्या सराईत आरोपीस मध्य प्रदेशातून अटक; ६ लाखांचा मुद्देमाल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 15:05 IST