पुणे : जुन्या भांडणाच्या केसमध्ये मध्यस्थी करण्यास नकार दिल्याचा राग तसेच त्याच्या तक्रारीमुळे एमपीडीए लागल्याच्या कारणातून टोळक्याने कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याबाबत भाऊसाहेब गोपीनाथ राखपसरे (४८, रा. मोझे आळी, चिरके कॉलनी, राखपसरे वस्ती, लोहगाव) यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी नितीन सकट, निकेश पाटील, गणेश सखाराम राखपसरे, ओंकार खांडे (खंड्या) यांच्यासह अन्य २ साथीदारांवर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत भाऊसाहेब राखपसरे हे गंभीर जखमी झाले आहेत. लोहगाव येथील एम डी मोझे पेट्रोल पंप येथे १३ ऑगस्ट रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास हा प्रकार घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा चुलत भाऊ व गणेश राखपसरे यांच्यात भांडणे झाली होती. त्यात गुन्हा दाखल झाला होता. ती केस आता कोर्टात सुनावणीला आली होती. तेव्हा गणेश राखपसरे याने फिर्यादी भाऊसाहेब राखपसरे यांची सायंकाळी भेट घेऊन ती केस मागे घेण्यास सांगा, असे बोलला. त्यावर भाऊसाहेब राखपसरे यांनी तुमचे तुम्ही पहा मला काही सांगू नका, असे म्हणून मध्यस्थी करण्यास नकार दिला. त्यानंतर रात्री फिर्यादी हे मोझे पेट्रोल पंप येथे खुर्चीवर बसले असताना त्यांच्या चुलत भावाच्या जुन्या भांडणाचा राग मनात धरून तसेच एमपीडीए तुझ्यामुळेच लागली, या समजातून नितीन सकट व ओंकार खांडे, निकेश पाटील व गणेश राखपसरे तसेच त्यांचे दोन साथीदार दुचाकीवरून आले. सापडला, सापडला याला आज संपवूनच टाकू, असे बोलून फिर्यादी बसलेल्या प्लास्टिकच्या खुर्चीला लाथ मारून त्यांना खाली पाडले.
याला आज सोडायचेच नाही, असे म्हणून हातातील कोयत्याने त्यांच्या हातावर, डोक्याला गंभीर दुखापत केली. ते पडलेले पाहून निकेश पाटील याने नितीन सकट याच्याकडे पाहून अप्पा, अप्पा कार्यक्रम झाला असे म्हणून सर्व जण पळून गेले. त्यानंतर लोकांनी भाऊसाहेब राखपसरे यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. सहायक पोलिस निरीक्षक सचिन धामणे पुढील तपास करत आहेत.