पुणे : जर्मनीत हॉटेल व्यवसायात भागीदारी देण्यासह चांगला पगार देण्याचे आमिष दाखवून ५४ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किरण कुमार त्रिवेदी (रा. कांताकुंज, गुजरात), चंद्रेश त्रिवेदी, जान्हवी चंद्रेश त्रिवेदी (दोघेही रा. साल्सबर्गर स्ट्रीट, जर्मनी), नीती पांडेय, तृप्ती नितीन पांडेय (२८, दोघेही रा. वल्लभनगर, इंदूर, मध्य प्रदेश) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत हरदीपसिंग अमोलकसिंग होरा (५४, रा. सायकल मर्चंट हाऊसिंग सोसायटी, रास्ता पेठ) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जर्मनीत किल नावाच्या शहरात दोन रेस्टॉरंट ॲण्ड बार आहेत. त्या रेस्टॉरंट बारमधून कोट्यवधींचा नफा होतो. त्यामुळे आपण नवीन हॉटेल चालू करणार आहोत. या हॉटेल व्यवसायात २५ टक्के शेअरपोटी ५४ लाख गुंतवणूक केल्यास तुमच्या मुलास दोन लाख रुपये प्रतिमहिना पगार देऊ. तसेच भाच्याला सुद्धा व्यवसायात भागीदार बनवू, असे आमिष आरोपींनी फिर्यादी होरा यांना दाखवले. यासाठी वेगवेगळ्या बहाण्याने ५४ लाख रुपये बँक ट्रान्सफर तसेच रोख स्वरूपात घेतले. त्यानंतर कोणताही हॉटेल व्यवसाय सुरू न करता होरा यांची ५४ लाखांची आर्थिक फसवणूक केली. पुढील तपास समर्थ पोलिस करत आहेत.