ब्रेक फेल झालेल्या बसचालकाच्या प्रसंगावधाने ५० प्रवासी सुरक्षित
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2019 12:16 IST2019-01-22T10:51:09+5:302019-01-22T12:16:16+5:30
नऱ्हे येथून शनिवारवाडा येथे जात असलेल्या बसचे सेल्फी पॉईंट येथे ब्रेक फेल झाले. मात्र चालकाने प्रसंगावधान राखून बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या कठड्याला नेल्याने ५० प्रवासी सुरक्षित राहीले आहेत.

ब्रेक फेल झालेल्या बसचालकाच्या प्रसंगावधाने ५० प्रवासी सुरक्षित
पुणे : नऱ्हे येथून शनिवारवाडा येथे जात असलेल्या बसचे सेल्फी पॉईंट येथे ब्रेक फेल झाले. मात्र चालकाने प्रसंगावधान राखून बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या कठड्याला नेल्याने ५० प्रवासी सुरक्षित राहीले आहेत. मंगळवारी सकाळी पावणे आठच्या सुमारास ही घटना घडली.
नऱ्हे येथून सकाळी ७ वाजून ४० मिनिटांनी शनिवारवाडा येथे पीएमपीची बस निघाली होती़. कामाला व कॉलेजला जाणारे प्रवासी बसमधून प्रवास करत होते. काही अंतर गेल्यानंतर सेल्फी पॉईंट येथे बसचे ब्रेक फेल झाल्याचे बसचालक हनुमंत शंकर नरवडे यांच्या लक्षात आले. बसला हॉर्न नसल्याने चालकाने आरडाओरडा करुन पुढच्या वाहनांना सावध करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी प्रसंगावधान राखून त्यांनी बस रस्त्याच्या कडेला असलेल्या थोड्याच्या चढावर नेली. राडारोडा व छोटी झुडपे यामुळे बस थांबली. हा सर्व प्रकार पाहून बसमधील प्रवासी प्रचंड घाबरले होते. बसचालक हनुमंत नरवडे यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानाने त्यांचे कौतुक होत आहे.