भोर : नीरा देवघर धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने धरणातील विहिरीचे पाणी कमी झाले आहे. याचा फटका वारखंड गावाला बसला असून, गावात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. ग्रामपंचायतीने टैंकर मागणीचा प्रस्ताव पंचायत समितीकडे दिला आहे. मात्र, अद्याप टैंकर सुरू झालेला नाही.वारखंड गावाची लोकसंख्या २३० असून, गावात पाळीव जनावरे ११० आहेत. दरवर्षी १५ एप्रिलनंतर पाण्याची टंचाई जाणवते. नीरा देवघर धरणाच्या पात्रात विहीर काढून वारखंड गावाला नळपाणी पुरवठा योजना केली होती. मात्र, सध्या नीरा देवघर धरणात २७ टक्के पाणी साठा शिल्लक असून, पॉवर हाऊसमधून ७५० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
धरणातील पाण्याची पातळी खालावल्याने धरण क्षेत्रातील गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीतील पाणी पातळी कमी होत असल्याने मोठ्या प्रमाणात टंचाई जाणवत आहे धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने भोर महाड रस्त्यावरील वारखंड गावाला पाणी पुरवठा करणारी विहिरीतील पाणी कमी होऊन तळ गाठला आहे.पाणी पुरवठा करणारी विद्युत मोटार उघडी पडली आहे. मागील आठवडाभरापासून भोर महाड रस्त्याचे काम सुरू असलेल्या ठेकेदाराला ग्रामस्थांनी विनंती केल्याने दररोज दहा हजार लीटर पाणी एक टँकरने विहिरीत सोडले जात असल्याने तात्पुरती पाण्याची सोय केली करण्यात आली आहे. दरम्यान, एप्रिल महिन्याचे पुढील पंधरवडा व जून महिन्यात
पावसाला सुरु होईपर्यंतचे दिवस असा जवळपास दोन ते अडीच महिने वारवंड ग्रामस्थांना पाण्याची टंचाई भासत आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने टँकरचा प्रस्तावास तातडीने मंजुरी देऊन टँकर सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. हिर्डोशी भागातील रिंगरोडवरील व भोर महाड रस्त्यावरील पन्हर बुद्रुक व वाड्धा वस्त्या शिळिंब राजीवडी उंबर्डे, वारवंड, कुडली खुर्द, शिरवली हिमा या गावाचे गेल्या वर्षी टँकरचे प्रस्ताव मार्च महिन्यात मंजुरीसाठी आले होते. यावर्षी यातील वारखंड गावचाच प्रस्ताव पंचायत समितीकडे आला आहे.
हुंबेवस्तीतील महिलांची दोन किलोमीटरची पायपीट- वेळवंड खोऱ्यातील जयतपाइ येथील जलजीवन मिशन योजनेंर्तगत मंजूर नळपाणीपुरवठा योजनेचे काम रखडल्याने हुंबेवस्ती येथील नागरिकांना मागील दहा दिवसांपासून मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे महिलांना सुमारे दोन किलोमीटरवर असलेल्या विचारेवाडी येथून डोक्यावरून उन्हात पाणी आणावे लागत आहे.
- जयतपाड गावची लोकसंख्या ८१७असून, गावासाठी जलजीवन मिशन अंर्तगत २०२३ साली जयतपाड मधील गावठाण हुंबेवस्ती रांजणवाडी, विचारेवाडी, निवंगणी यांच्यासाठी सुमारे एक कोटी ९ लाख रुपये योजना मंजूर आहे. मात्र यातील पाणीपुरवठा विहीर पंपिंग मशीन बसवल्या आहेत, तर पाइपलाइनचे काम अर्थवट अवस्थेत आहे. कामाची मुदत २०२४ साली संपूनही अद्याप योजनेचे काम झालेले नाही. त्यामुळे गावात पाणीटंचाई वाढली असून, हूंबेवस्ती येथील नागरिक सध्या दोन किलोमीटरवर असलेल्या विचारेवाडी येथील जुन्या पाइपलाइनवरून महिला डोक्यावरून पाणी आणत आहेत.
- हुंबेवस्तीसाठी टैंकर मागणीचा प्रस्ताव भोर पंचायत समितीला दिला असून, टैंकर मंजूर होईपर्यंत संबंधित ठेकेदाराने खासगी टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी सरपंच सुजाता दिघे यांनी केली आहे. दरम्यान, कामाची मुदत संपल्यावर काम पूर्ण न झाल्याने संबंधित ठेकेदाराला काम पूर्ण करण्याबाबत पाणीपुरवठा विभागाने नोटीस दिल्याचे नळपाणीपुरवठा विभागाने सांगितले.
गावात पाणीटंचाई जाणवू लागल्याने टँकरचा प्रस्ताव भोर पंचायत समितीला देण्यात आला आहे. मात्र, त्यावर कार्यवाही झालेली नाही. तातडीने टँकर सुरु करण्यात यावा. तसेच कायमची पाणी टंचाई कमी होण्यासाठी प्रशासनाकडून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. - प्रदीप दिघे,उपसरपंच, वारखंड 66 तालुक्यातील जलजीवनच्या १७८पैकी ८६ कामे पूर्ण झाली असून, उर्वरित कामे प्रगतीपथावर आहेत. करंदी खेबा व साळवडे गावचे टँकरचे आलेले प्रस्ताव मंजुरीसाठी तहसील यांच्याकडे विभागाकडे पाठविण्यात आले असून, त्यातील साळवडे गावचा प्रस्ताव आजच मंजूर झाला आहे. वारखंडचाही प्रस्ताव तातडीने मंजुरीसाठी पाठविण्यात येणार असून, प्रस्ताव मंजूर होताच टँकर सुरू करण्यात येतील. - एम. व्ही. भामरे, उपअभियंता पाणी पुरवठा