बारामती -बारामती नगर परिषदेच्या वतीने २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या अधिकृत कार्यक्रमात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा न लावल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी नगर परिषदेच्या कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त करत नगराध्यक्ष सचिन सातव यांच्यावर शाई फेकल्याची घटना घडली.
प्रजासत्ताक दिनानिमित्त बारामती नगर परिषदेमध्ये महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले होते. मात्र, संविधानाचे शिल्पकार आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा कार्यक्रमस्थळी न ठेवल्याने आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली. “संविधानामुळेच प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो, आणि त्या संविधानाच्या निर्मात्यालाच डावलले जाते, ही बाब अत्यंत दुर्दैवी व अपमानास्पद आहे,” असा आरोप आंदोलकांनी केला.
या पार्श्वभूमीवर आज मोठ्या संख्येने आंबेडकरी अनुयायी बारामती नगरपालिकेसमोर एकत्र जमले. हातात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा घेऊन त्यांनी नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध आंदोलन केले. “बाबासाहेबांचा अवमान खपवून घेतला जाणार नाही,” “नगर परिषदेने जाहीर माफी मागावी,” अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
आंदोलनादरम्यान संतप्त कार्यकर्त्यांनी नगराध्यक्ष सचिन सातव यांच्यावर शाई फेकली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला.
Web Summary : Baramati saw protests after Dr. Ambedkar's image was missing at Republic Day event. Angered followers threw ink at the mayor, demanding apology for disrespecting the constitution's architect. Police intervened to control the situation.
Web Summary : बारामती में गणतंत्र दिवस कार्यक्रम में डॉ. आंबेडकर की तस्वीर गायब होने पर विरोध प्रदर्शन हुआ। नाराज अनुयायियों ने संविधान के निर्माता का अपमान करने पर महापौर पर स्याही फेंकी और माफी की मांग की। पुलिस ने स्थिति को नियंत्रण में किया।