pune accident: भीषण अपघातामुळे यवत गावावर शोककळा; सर्व बाजारपेठांमध्ये कडकडीत बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2019 13:06 IST
यवत येथील काही तरुण रायगड येथे गुरुवारी पर्यटनासाठी गेले होते. तिथून परतत असताना शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात नऊ युवकांचा जागीच मृत्यू झाला..
pune accident: भीषण अपघातामुळे यवत गावावर शोककळा; सर्व बाजारपेठांमध्ये कडकडीत बंद
यवत : पुणे- सोलापूर महामार्गावर लोणी काळभोर येथे शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या अपघातात यवतमधील नऊ युवक जागीच ठार झाल्याने गावावर शोककळा पसरली. अपघाताची बातमी गावात समजताच सकाळपासून बाजारपेठेतील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. या भीषण अपघातामुळे गावात सर्वत्र सुन्न वातावरण निर्माण झालेले होते. यवत येथील काही तरुण रायगड येथे गुरुवारी पर्यटनासाठी गेले होते. तिथून परतत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे गाडी दुभाजकाला धडक देत विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकला धडकली. शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात नऊ युवकांचा जागीच मृत्यू झाला. त्यात यवत स्टेशन भागातील विशाल सुभाष यादव , निखिल चंद्रकांत वाबळे , अक्षय चंद्रकांत घिगे , दत्ता गणेश यादव ,स्टेशन रोड परिसरातील सोनू उर्फ नूर महंमद दाया , परवेझ अशपाक आत्तार , महालक्ष्मीनगरमधील अक्षय भारत वाईकर , गावठाण मधील जुबेर अजित मुलानी व कासुर्डी येथील शुभम रामदास भिसे यांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बातमी समजताच गावातील अनेक युवक लोणी काळभोर कडे मध्यरात्रीच्या सुमारास रवाना झाले होते.पहाटेच्या सुमारास गावात सर्वत्र अपघाताची बातमी पसरल्या नंतर मृत युवकांच्या घरामसमोर गर्दी जमा होऊ लागली.यातच त्यांच्या घरातील लोकांना सकाळी अपघाताची माहिती मिळाल्यानंतर एकच आक्रोश सर्वत्र दिसून येत होता.शनिवार असल्याने सकाळी विद्यालयात जाणा?्या विद्यर्थ्यांची लगबग सकाळी सुरू असताना अपघाताची माहिती मिळताच अनेक विद्यार्थ्यांनी परत घरी जाण्याचा मार्ग पत्करला.गावातील शाळा सुरू झाल्यानंतर मृत युवकांना श्रद्धांजली अर्पण करून शाळांना सुट्टी देण्यात आली होती. भीषण अपघातामुळे गावात सर्वत्र सुन्न वातावरण निर्माण झालेले होते.