ब्रेक फेल बसखालीं आलेल्या ज्येष्ठाचा वाचला जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 03:39 AM2018-05-11T03:39:56+5:302018-05-11T03:39:56+5:30

पीएमपीचा ब्रेक फेल झालेला... चालकाला बस कशी थांबवावी ते कळेना... डावीकडे व उजवीकडेही वाहने असल्याने बसने समोरीला दुचाकीला धडक दिली... दुचाकीवरील ज्येष्ठ नागरिक बसखाली गेला... नागरिकांनी प्रयत्न करून बसला थांबविले आणि ज्येष्ठ नागरिकाला ओढून बाहेर काढले.

pune Accident News | ब्रेक फेल बसखालीं आलेल्या ज्येष्ठाचा वाचला जीव

ब्रेक फेल बसखालीं आलेल्या ज्येष्ठाचा वाचला जीव

Next

वारजे - पीएमपीचा ब्रेक फेल झालेला... चालकाला बस कशी थांबवावी ते कळेना... डावीकडे व उजवीकडेही वाहने असल्याने बसने समोरीला दुचाकीला धडक दिली... दुचाकीवरील ज्येष्ठ नागरिक बसखाली गेला... नागरिकांनी प्रयत्न करून बसला थांबविले आणि ज्येष्ठ नागरिकाला ओढून बाहेर काढले. तेव्हा ते सुखरूप होते. ते पाहून सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. जुना जकात नाका येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात गुरुवारी दुपारी ही थरारक घटना घडली.
उमाजी गणपत मरळ (वय ६४, रा. शिवणे) व त्यांचा सात वर्षीय नातू अपघातात थोडक्यात बचावले. याबाबत बसचालक, वाहक घटनेचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी बाराच्या सुमारास डेक्कनवरून सांगरूणला जाणारी पीएमपी आंबेडकर चौकात आली. चौकात येण्यापूर्वीच (टायर फुटल्यासारखा) मोठा आवाज होऊन त्याचा ब्रेक पाइप फुटला. यामुळे ब्रेक नादुरुस्त झाल्याची कल्पना चालक रवाजी बाबूराव म्हेत्रे (वय ५४ वर्षे, रा. शिवणे) यांना आली. त्यांनी गियर बदलून बसचा ब्रेक कमी करण्याचा प्रयत्न केला. पण चौकात वाहने एका जागेवर उभी होती. तसेच बसच्या डाव्या बाजूनेही अनेक वाहने जात असल्याने बस डावीकडे वळवणे देखील शक्य नव्हते. त्यामुळे बसने पुढे दुचाकीवर जात असलेल्या मरळ यांना धडक दिली. यात सुदैवाने त्यांचा नातू हा रस्त्याच्या उजव्या बाजूकडील सर्कलच्या बाजूला फेकला गेला. त्यास खूप काही इजा झाली नाही. पण मरळ हे मात्र दुचाकीसह खाली पडले व बसच्याखाली गेले. बस तरीही पुढे पुढे जातच होती. शेजारच्या नागरिकांनी आरडाओरड करून चालकाचे लक्ष वेधण्याचा व बस थांबवण्याचा प्रयत्न केला. पण ब्रेक फेल झाल्याचे नागरिकांच्याही लक्षात आले नाही. या वेळी काही फूट बसने दुचाकीसह मरळ यांना फरफटत नेले. नंतर मात्र इतर वाहनचालक व नागरिकांनी बसला समोरून अडवले. तसेच बसखाली दुचाकी असल्याने बसचा वेग कमी झाला. तेव्हा चालकही बस थांबविण्यासाठी प्रयत्न करीत होता. एकत्रित प्रयत्न झाल्याने बस थांबली. तेव्हा नागरिकांनी बसखाली गेलेल्या ज्येष्ठ नागरिकाला ओढून बाहेर काढले. त्या ज्येष्ठ नागरिकाला जास्त काही लागले नसल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. या अपघातामुळे चौकात काही काळ कोंडी झाली होती. वाहतूक पोलिसांनी लगेच ब्रेक फेल झालेल्या बसला बाजूला केले आणि वाहतूक सुरळीत केली.

Web Title: pune Accident News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.