Pune Accident: friendship from first standard will end in road accident at pune | Pune Accident : पहिलीपासूनची मैत्री काळानेच नेली हिरावून
Pune Accident : पहिलीपासूनची मैत्री काळानेच नेली हिरावून

पुणे : पुणे-सोलापूर रोडवर झालेल्या भीषण अपघातात ९ जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातातील ८ जण यवतमधील जनविद्या विकास मंदिर या शाळेत २०१४ - १५ च्या दहावीच्या बॅचमध्ये एकत्र होते. यातील सर्व जण पहिल्या इयत्तेपासून वर्ग मित्र होते.


शुक्रवारी सकाळी ८ वाजता ते रायगड येथे वर्षाविहारासाठी गेले होते. पहाटे एक वाजण्याच्या सुमारास ते पुण्याकडून यवतकडे येत होते. त्यावेळी वेगामुळे अथवा चालकाला डुलकी लागल्यामुळे त्यांच्या कारने दुभाजक तोडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकला धडक दिली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमधील आठ जण यवत मधील तर एक जण कासुर्डी येथील आहे.


 दत्ता गणेश यादव हा जेएसपीएम कॉलेज (उंड्री) येथे शिकत होता. निखिल चंद्रकांत वाबळे हा विश्वराज हॉस्पिटल येथे बाऊन्सर म्हणून काम करीत होता. विशाल सुभाष यादव हा जेएसपीएम कॉलेज, वाघोली येथे शिकत होता. शुभम भिसे (कासुर्डी) हा उरुळी कांचन येथील कॉलेजमध्ये बीसीएसला होता. 


अक्षय चंद्रकांत घिगे हा हडपसर येथील आणासाहेब मगर महाविद्यालयात बीसीएसच्या शेवटच्या वर्षाला होता. विशाल सुभाष यादव हा यवत येथील माजी उपसरपंच सुभाष यादव यांचा मुलगा आहे.


सोनू उर्फ नूर महम्मद दाया हा लोणी काळभोर  येथे  बीए़च्या दुसऱ्या वर्षाला शिकत होता. अक्षय भरत वायकर हा घरी व्यवसाय करीत असे. जुबेर अजित मुलानी हा एके ठिकाणी कामाला जात होता. परवेज अश्फाक अत्तार हा पूना कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगला शिकत होता.


परवेजचे वडील आठवडी बाजारामध्ये काथ्या साबण विक्रीचे दुकान लावतात. त्यांच्या त्या व्यवसायावर त्यांनी परवेजला बीसीएच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन दिला. तो शेवटच्या वर्षाला होता. या वर्षी पास झाल्यावर एका चांगल्या कंपनीत कामाला लागून वडिलांचे स्वप्ने पूर्ण करायचे आहे, असे आम्हाला परवेज सांगायचा. पण त्याच्या अपघाती निधनामुळे त्याचं हे स्वप्न अपूर्णच राहिले, असे परवेजचा भाऊ मोहसीनने सांगितले.


Web Title: Pune Accident: friendship from first standard will end in road accident at pune
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.