VIDEO | पुण्यातील रिक्षा चालकांचे आंदोलन चिघळले, दंगल नियंत्रण पथक घटनास्थळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2022 20:56 IST2022-12-12T20:53:13+5:302022-12-12T20:56:17+5:30
दंगल नियंत्रण पथक घटनास्थळी पोहचले आहे...

VIDEO | पुण्यातील रिक्षा चालकांचे आंदोलन चिघळले, दंगल नियंत्रण पथक घटनास्थळी
पुणे : बेकायदा बाईक टॅक्सी बंद करण्यात यावी, या मागणीसाठी पुण्यात रिक्षा चालकांचे आंदोलन सुरू आहे. रिक्षा चालक त्यांच्या रिक्षा संगम ब्रिजच्याजवळ रस्त्यालाच पार्क करून गेले आहेत.आता पोलीस त्या रिक्षा काढत आहेत. मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत रिक्षा काढणार नाही अशी रिक्षा चालकांनी भूमिका घेतली आहे. दंगल नियंत्रण पथक घटनास्थळी पोहचले आहे.
पुण्यात बेकायदा बाईक टॅक्सीविरोधात बघतोय रिक्षावाला संघटनेचे आंदोलन सुरू आहे. शहरात ठिकठिकाणी रिक्षा चालकांनी रस्त्यावर आंदोलन सुरू केले. यामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जॅम झाले होते. जोपर्यंत रॅपिडो बाईक टॅक्सी बंद करण्यात येत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच असेल, असं या रिक्षा चालकांच्या संघटनेकडून सांगण्यात आले आहे. आता पोलीस अॅक्शन मोड आले असून त्यांनी घटनास्थळी पोहचत रिक्षा काढण्यास सुरुवात केली आहे.
शहरातील ओला आणि उबेर बाईक टॅक्सीवर प्रशासनाने कारवाई केली आहे. या दोन्ही कंपनीची शहरातील बाईक टॅक्सी बंद करण्यात आली आहे. आता रॅपिडो कंपनीची बाईक टॅक्सीही बंद करण्याची मागणी रिक्षा चालकांनी उचलून धरली आहे.
रॅपिडो बाईक टॅक्सी जोपर्यंत बंद होत नाही. तोपर्यंत आम्ही आंदोलनातून माघार घेणार नाही. जर ओला, उबेरची बाईक टॅक्सी बंद झाली आहे तर रॅपिडोची का बंद होत नाही? शासनाने लवकरात लवकर रॅपिडोवर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे
- केशव क्षीरसागर (अध्यक्ष, बघतोय रिक्षावाला संघटना, पुणे)