पुणे : राजस्थानच्या इंग्रजी माध्यमातील अाठव्या इयत्तेच्या समाजशास्त्राच्या संदर्भ पुस्तिकेत लाेकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा दहशतवादाचे जनक असा अारेपार्ह उल्लेख केला अाहे. या पार्श्वभूमिवर राजस्थान सरकारचा पुण्यातील शाहिरांनी अनाेख्या पद्धतीने निषेध केला. राजस्थान सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ?...,होय आम्ही टिळकांचे अनुयायी....,टिळक दहशतवादाचे जनक तर देशभक्त कोण...नमन हे लोकमान्यांच्या पाया...अशा शब्दातून पुण्यातील शाहिरांनी राजस्थान सरकारचा निषेध केला. शाहीर हिंगे लाेककला प्रबाेधिनीतर्फे राजस्थान सरकारची शाहिरीतून कानउघाडणी करण्यात अाली. महात्मा फुले मंडई येथील लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रबोधिनीचे अध्यक्ष शाहीर हेमंत मावळे, शाहीर चेतन हिंगे, प्रा. संगिता मावळे आणि प्रबोधिनीचे विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी स्फूर्तीदायी पोवाड्यातून लोकमान्य टिळकांचे कार्य शाहिरांनी उपस्थितांना सांगितले. शाहीर हेमंत मावळे म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्याचे अग्रणी असलेल्या लोकमान्य टिळकांचा उल्लेख राजस्थानमधील आठवीतील पुस्तकात दहशतवादाचे जनक असा करण्यात आला आहे, याचा विरोध करण्यासाठी आणि लोकमान्य टिळकांचा गौरव लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आंदोलनात्मक शाहीरीचे आयोजन करण्यात आले. स्वातंत्र्याचा लढा ज्यांनी उभा केला, त्यांचा असा उल्लेख करणे ही राजस्थान सरकारची घोडचूक आहे, त्यामुळे त्यांनी ताबडतोब ही चूक सुधारावी, अशी मागणी यावेळी शाहिरांनी केली.
राजस्थान सरकारचा शाहिरीतून निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 19:55 IST