Pro Kabaddi League : यूपी योद्धाज व बंगाल वॉरियर्स लढत बरोबरीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 21:02 IST2024-12-13T21:00:00+5:302024-12-13T21:02:43+5:30

मध्यंतराला यूपी योद्धाज संघाकडे १५-१३ अशी नाममात्र आघाडी होती.

Pro Kabaddi League: UP Yoddhas and Bengal Warriors draw | Pro Kabaddi League : यूपी योद्धाज व बंगाल वॉरियर्स लढत बरोबरीत

Pro Kabaddi League : यूपी योद्धाज व बंगाल वॉरियर्स लढत बरोबरीत

पुणे : अतिशय अटीतटीच्या सामन्यात यूपी योद्धाज व बंगाल वॉरियर्स यांच्यातील लढत ३१-३१ अशी बरोबरी सुटली त्यामुळेच प्रो कबड्डी लीग मध्ये आज प्रेक्षकांना खेळाचा निखळ आनंद घेता आला. मध्यंतराला यूपी योद्धाज संघाकडे १५-१३ अशी नाममात्र आघाडी होती.

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथील बॅडमिंटन हॉलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत आजच्या पहिल्या सामन्याप्रमाणे दुसऱ्या सामन्यातही विलक्षण रंगत पहावयास मिळाली.

यूपी योद्धाज संघाने आतापर्यंत झालेल्या १७ सामन्यांपैकी नऊ सामने जिंकले होते तर बंगाल संघाने तेवढ्याच सामन्यांमध्ये फक्त पाचच सामने जिंकण्यात यश मिळवले. त्यामुळे आजच्या लढतीत यूपी संघाचे वर्चस्व राहील अशी अपेक्षा होती. मात्र बंगाल वॉरियर्स संघाने त्यांना सुरुवातीपासूनच चिवट लढत दिली. तरीही मध्यंतरापर्यंत युपी योद्धा संघाने आघाडी कायम ठेवण्यात यश मिळविले. त्यांचा हुकमी चढाईपटू भवानी रजपूत याने या मोसमात चढाईच्या गुणांचे शतक ओलांडले तर त्याचा सहकारी हितेश याने पकडी मधील गुणांचे अर्धशतक साजरे केले.

उत्तरार्धात सुरुवातीपासूनच बंगालच्या खेळाडूंनी बरोबरी करण्यासाठी सतत प्रयत्न केले पण अखेर २५ व्या मिनिटाला १६-१६ अशी बरोबरी करण्यात त्यांनी यश मिळवले. मात्र त्यानंतर दोन्ही संघांमध्ये आघाडी मिळवण्यासाठी सतत चढाओढ दिसून आली.

सामन्याच्या ३०व्या मिनिटाला बंगाल संघाचा कर्णधार फाजल अत्राचेली याने गगन गौडा त्याची पकड करीत प्रतिस्पर्धी संघावर लोण चढविला आणि संघाला आघाडीवर नेले. मात्र गौडा याने पुढच्या चढाईत तीन गडी बाद करीत सुपर रेडचा मान मिळवला. शेवटची पाच मिनिटे बाकी असताना युपी योद्धा संघाकडे २७-२४ अशी आघाडी होती. एक मिनिट बाकी असताना त्यांच्याकडे दोन गुणांची आघाडी होती. बंगालकडून प्रणय राणे व नितेश कुमार यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.

 
तेलुगु टायटन्सपेक्षा दिल्ली संघ ठरला 'दबंग'च

पूर्वार्धात चार गुणांनी पिछाडीवर असूनही कोणतेही दडपण न घेता दबंग दिल्ली संघाने तेलुगु टायटन्स संघावर ३३-२७ असा रोमहर्षक विजय नोंदविला आणि प्रो कबड्डी लीगमध्ये प्ले ऑफच्या आशा कायम ठेवल्या
दबंग दिल्लीने आतापर्यंत १७ सामन्यांपैकी आठ सामने जिंकले होते. पुण्यातील लढतींमध्ये त्यांनी तमिळ थलाईवाज संघावर मात केली होती तर युपी योद्धाजविरुद्ध त्यांना बरोबरी स्वीकारावी लागली होती तेलुगू टायटन्स संघाने १८ पैकी दहा सामने जिंकले होते येथे त्यांना जयपूर पिंक पँथर्स, हरयाणा स्टीलर्स या संघांविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता. बंगाल वॉरियर्सला त्यांनी दोन गुणांनी हरविले होते त्यामुळे आजच्या लढतीत त्यांच्याकडून मोठी अपेक्षा होती.

Web Title: Pro Kabaddi League: UP Yoddhas and Bengal Warriors draw

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.