Principal beggar asking for only one rupee | केवळ एकच रुपया मागणारा तत्वनिष्ठ भिकारी...
केवळ एकच रुपया मागणारा तत्वनिष्ठ भिकारी...

संदीप चाफेकर- 
             यवत : आजच्या युगात समाजातील प्रामाणिक माणसे कमी होत चाललेली असताना  वाढत्या भिकाऱ्यांची समस्या ग्रामीण व शहरी भागात एक मोठी समस्या ठरत आहे.कसलीही शारीरिक विकलांगता नसलेले आणि शारिरीक दृष्ट्या उत्तम असणारे देखील ठिकठिकाणी भीक मागताना आपल्याला सहजपणे नजरेस पडतात.एखाद्याला भीक मागितल्यानंतर काही न दिल्यास वेडेवाकडे बोलून शिव्या शाप देण्यापर्यंत भिकाऱ्यांची मजल जाते.
             मात्र याला अपवाद म्हणा किंवा आजच्या काळातील दुर्मिळ उदाहरण म्हणा  , एक प्रामाणिक भिकारी मागील दहा ते पंधरा वर्षांपासून भीक मागून त्यांचे आयुष्य जगत आहे.आता भिकारी म्हटल्यावर तो प्रामाणिक आणि अप्रामाणिक कसा ठरवायचा असा प्रश्न निश्चितच पडेल मात्र हा भिकारी कोणाकडूनही एक रुपयांपेक्षा जास्तीची भीक घेत नाही एखाद्याने एक पेक्षा जास्तीचे रुपये दिल्यास तो प्रामाणिकपणे नकार देऊन एक रुपया घेऊन उरलेले पैसे तर परत देतो.कोणी न दिल्यास काही वाईट न बोलता हसतमुख निघून जातो हीच काय ती त्याची आयुष्यातील प्रामाणिकता आहे यातून त्याला मोठे समाधान मिळत असल्याचे सांगतो.त्याच्या याच वृत्तीमुळे त्याला ओळणारे अनेक व्यापारी , बाजारकरू छोटे व्यावसायिक बोलवून त्याला मदत देऊ करतात मात्र त्यांच्याकडूनही तो एक रुपयांपेक्षा जास्तीची मदत घेत नाही.
              हिरामण सिग्राम दाते यांचे वय सध्या ६० वर्षे झाले असून वाढत्या वयानुसार काम करणे शक्य नसल्याने मागील दहा ते पंधरा वर्षांपासून भीक मागून जगण्याशिवाय त्यांच्यासमोर पर्याय राहिला नव्हता.बालपणापासून नशिबी अपंगत्व आल्याने कष्ट करून जगताना मोठ्या अडचणी होत्या.पिढ्यान पिढ्या चालत आलेला दगड फोडून मजुरी करण्याचे काम हिरामण यांनी केल्याचे ते सांगतात.आता वय वाढल्याने दगड फोडण्याची शक्ती अंगात नाही याचबरोबर 
६३ % अपंगत्व असल्याने जगायचे कसे हा प्रश्न होताच आता भीक मागायची वेळ आली असली तरी त्यांनी आयुष्यातील प्रामाणिक वृत्ती मात्र अजूनही जोपासली आहे.
             सर्व काही साधने , उत्कृष्ट शरीर लाभले असतानाही नशिबाला आणि दैवाला दोष देणारी अनेक माणसे आपण समाजात पाहातो मात्र हिरामण दाते यांच्यासारख्या माणसाची जिद्द आणि समाधानी वृत्ती पाहिल्यानंतर निश्चितच अनेकांना त्यांचा हेवा वाटल्याशिवाय राहत नाही.
             भिगवण (ता.इंदापूर) येथे मागील अनेक वर्षे हिरामण दाते वास्तव्यास आहेत.घरात पत्नी आणि एक मुलगा असून पत्नी रस्त्याची कामे सुरू असतात तिथे मजुरी करते तर मुलगा इयत्ता १२ वी मध्ये शिक्षण घेत आहे.शिक्षणासाठी मुलाला त्याच्या आजोळच्या लोकांचे सहकार्य मिळत आहे.मात्र जातीचे पुरावे जवळ नसल्याने जातीचा दाखला मिळत नाही आणि जातीचा दाखला नसल्याने मुलाला शिक्षणातील सवलतीचा फायदा देखील मिळत नाही यामुळे जातीच्या दाखल्याची मोठी अडचण असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.


Web Title: Principal beggar asking for only one rupee
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.