पंतप्रधानांचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष
By Admin | Updated: February 15, 2016 02:48 IST2016-02-15T02:48:15+5:302016-02-15T02:48:15+5:30
मेक इन इंडियाच्या नावाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नवनवीन कारखान्यांच्या फिती कापण्यास वेळ आहे; परंतु देशभरात हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या

पंतप्रधानांचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष
पुणे : मेक इन इंडियाच्या नावाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नवनवीन कारखान्यांच्या फिती कापण्यास वेळ आहे; परंतु देशभरात हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्याकडे लक्ष द्यायला पुरेसा वेळ नसल्याची टीका माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली़
राष्ट्रीय मजदूर संघाच्या कामगार मेळाव्याप्रसंगी रविवारी काँग्रेस भवनात नवनिर्वाचित विधान परिषद आमदार व कामगारनेते भाई जगताप यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी ते बोलत होते़ याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष डॉ. विश्वजित कदम, पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष अॅड. अभय छाजेड, माजी महापौर कमल व्यवहारे, राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे उपस्थित होते.
हर्षवर्धन पाटील म्हणाले, ‘‘भाई जगताप हे घरेलू कामगारांचे, साखर कारखान्यांच्या कामगारांचे प्रश्न सोडवण्यास आग्रही असतात व हेच नेमके विरोधकांना रुचणारे नव्हते. त्यामुळे विरोधकांचा भाई जगताप यांना पाडण्याचा उद्देश होता़’’
भाई जगताप म्हणाले की, काँग्रेस सरकारच्या काळात कामगार संघटनांच्या प्रश्नाकडे थोडे दुर्लक्ष झाले़ विरोधकांनी डाळींचा भाव फक्त फोटो काढून घेण्यासाठी १०० रुपये केला. त्यानंतर मात्र डाळीचा भाव जैसे थे असल्याचे सांगितले.
याप्रसंगी विश्वजित कदमांनी पुन्हा एकदा मित्रपक्षावरचा नाराजीचा सूर आळवला व त्याला हर्षवर्धन पाटलांबरोबरच भाई जगतापांनीसुद्धा प्रतिसाद दिला. सहज-सोपी असणारी विधान परिषदेची निवडणूक मित्रपक्षाच्या दुटप्पी वागण्यामुळेच प्रतिष्ठेची झाली होती, असे भाई जगताप यांनी नमूद केले.