निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 06:34 IST2025-12-24T06:33:52+5:302025-12-24T06:34:13+5:30
फुटपाथवर, शाळेच्या बस थांब्यांजवळ जिथे सोसायटीतील मुले बसमध्ये चढतात व उतरतात अशा ठिकाणी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे हे बेकायदेशीर कृत्य ठरू शकत नाही.

निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : निश्चित नसलेल्या ठिकाणी भटक्या कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे हे भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा ठरत नाही, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने दिला. त्याचबरोबर पुण्यातील एका गृहनिर्माण सोसायटीच्या प्रवेशद्वाराजवळ भटक्या कुत्र्यांना अन्न देण्यास एका महिलेसह तिच्या मैत्रिणींना अडविल्याच्या आरोपावरून नोंदवण्यात आलेला गुन्हादेखील रद्द केला.
न्या. रेवती मोहिते डेरे आणि न्या. संदीप पाटील यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. न्यायालयाने म्हटले की, फुटपाथवर, शाळेच्या बस थांब्यांजवळ जिथे सोसायटीतील मुले बसमध्ये चढतात व उतरतात अशा ठिकाणी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे हे बेकायदेशीर कृत्य ठरू शकत नाही. आरोपीने तक्रारदार महिला आणि तिच्या मैत्रिणींना त्यांनी ज्या ठिकाणी कुत्र्यांना अन्न दिले तो फीडिंग स्पॉट नाही, असे सांगितले होते, असे न्यायालयाने या ठिकाणी अधोरेखित केले.
...म्हणून ‘ते’ कृत्य बेकायदा नाही
या प्रकरणातील व्यक्तीने सोसायटीतील मुलांच्या सुरक्षिततेसाठी कुत्र्यांना अन्न देण्यापासून महिलांना रोखले होते. कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या घटना घडल्याने त्याने ती काळजी घेतली. त्यामुळे त्याने केलेले कृत्य बेकायदेशीर ठरू शकत नाही, असे कोर्टाने स्पष्ट केले.
साेसायटीतील सदस्यांनी काय केले?
हिंजवडी पोलीस ठाण्यात जानेवारी महिन्यात नोंदवण्यात आलेल्या एफआयआरनुसार, तक्रारदार महिला जेव्हा हिंजवडी परिसरातील एका निवासी सोसायटीत रस्त्यावरील कुत्र्यांना अन्न देण्यासाठी गेली, तेव्हा आरोपी आणि सोसायटीतील इतर सदस्यांनी त्याला आक्षेप घेतला आणि तिला रोखले.
एफआयआर रद्द करण्याची मागणी करताना आरोपीने सांगितले, सोसायटीत ४० हून अधिक भटके कुत्रे असून त्यामुळे रहिवाशांना त्रास होत आहे. परिसरात कुत्र्यांनी लोकांना चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत.