आव्हाने स्वीकारण्याची तयारी ठेवा
By Admin | Updated: February 8, 2015 00:06 IST2015-02-08T00:06:25+5:302015-02-08T00:06:25+5:30
गरिबी, निरक्षरता आणि विषमता यांचे उच्चाटन झाल्यावरच देशात खऱ्या अर्थाने स्वराज्य येईल, असे महात्मा गांधी यांनी सांगितले होते.

आव्हाने स्वीकारण्याची तयारी ठेवा
पुणे : गरिबी, निरक्षरता आणि विषमता यांचे उच्चाटन झाल्यावरच देशात खऱ्या अर्थाने स्वराज्य येईल, असे महात्मा गांधी यांनी सांगितले होते. गांधीजींना अभिप्रेत असलेले स्वराज्य आणण्यासाठी आपण सर्वांनी आव्हाने स्वीकारण्याची तयारी ठेवली पाहिजे, असे आवाहन गुजरातचे राज्यपाल ओमप्रकाश कोहली यांनी आज पुण्यात केले.
सूर्यदत्ता एज्युकेशनल फाउंडेशनच्या १७व्या वर्धापन दिनी १२व्या सूर्यदत्ता जीवनगौरव आणि राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण कोहली यांच्या हस्ते झाले. दिवंगत व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांना मरणोत्तर ‘सूर्यदत्ता जीवनगौरव’ पुरस्कार देण्यात आला. त्यांच्या पत्नी कमला लक्ष्मण यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
आचार्य डॉ. लोकेश मुनी, शास्त्रीय गायिका डॉ. प्रभा अत्रे, उद्योजक शिव नडार, सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश बी. एन. श्रीकृष्ण, १९७५मध्ये देशाला हॉकीचा विश्वचषक जिंकून देणारे माजी कर्णधार अशोकुमार, किरण चोपडा यांनाही ‘सूर्यदत्ता जीवनगौरव’ने सन्मानित करण्यात आले. डॉ. कस्तुरीरंगन, डॉ. श्रावणकुमार, वेदप्रकाश, डॉ. चारुदत्त आपटे, डॉ. स्वाती लोढा, फत्तेचंद रांका, सुभाष रुणवाल, लक्ष्मी त्रिपाठी, अमर ओक यांना ‘सूर्यदत्ता राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. या वेळी आॅल इंडिया अँटी टेररिस्ट फ्रंटचे प्रमुख मनिंदरजितसिंग बिट्टा, ‘सूर्यदत्ता’चे संस्थापक-संचालक प्रा. डॉ. संजय चोरडिया, संचालिका सुषमा चोरडिया, अभिनेते शैलेश लोढा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कोहली म्हणाले, ‘‘देशाला स्वातंत्र्य मिळून ६७ वर्षे उलटली आहेत, तरीही महात्मा गांधी यांना अभिप्रेत असलेले स्वराज अद्याप येऊ शकलेले नाही. सध्या विकसनशील देश असलेल्या भारताला ‘मेक इन इंडिया’च्या माध्यमातून विकसित देश बनवण्याचे ध्येय आहे.
‘‘आपल्याकडे प्रचंड टॅलेंट आहे. त्याच्या विकासासाठी आवश्यक प्रोत्साहन आणि वातावरण आपण उपलब्ध करून द्यायला हवे. ’’
शिक्षणक्षेत्रात सूर्यदत्ता ग्रुपचे योगदान मोलाचे आहे. शिवाय आपापल्या क्षेत्रात भरीव कार्य करून समाजाच्या विकासात योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा गौरव करण्याचे मोलाचे कामदेखील ही संस्था करीत आहे, असेही कोहली यांनी आवर्जून नमूद केले.
विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सन्मान केल्याने ‘सूर्यदत्ता’ला स्वत:ला सन्मानित झाल्यासारखे वाटत असल्याची भावना प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी व्यक्त केली. किशन शर्मा यांनी सूत्रसंचालन केले.
(प्रतिनिधी)
४आर. के. लक्ष्मण यांना देण्यात आलेला मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार त्यांच्या पत्नी कमला लक्ष्मण यांनी स्वीकारला. उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात लक्ष्मण यांना मानवंदना दिली. कमला लक्ष्मण म्हणाल्या, ‘‘समाजाच्या सर्व स्तरांतील लोकांनी आर. के. यांच्या कामाचे कौतुक केले. त्यांचा कॉमन मॅन सर्वांनाच आपलासा वाटला. हा पुरस्कार स्वीकारताना मला अभिमान वाटतो. ते असते, तर आनंद द्विगुणित झाला असता.’’